सेप ब्लाटर यांच्या मागे लागलेला वादविवादांचा ससेमिरा अद्याप संपलेला नाही. फिफाच्या महाघोटाळाप्रकरणी सर्व स्तरांतून दबाव वाढल्याने ब्लाटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीवेळी ब्लाटर अनुपस्थित राहणार असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ब्लाटर यांच्यासह महासचिव जेरोम व्हाल्केही अंतिम लढतीवेळी उपस्थित राहणार नसल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. मात्र कॅनडा सॉकर असोसिएशन आणि फिफाने या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘‘ब्लाटर आणि व्हाल्के उपस्थित राहणार का, हे तितके महत्त्वाचे नाही. दिमाखदार स्पर्धेची अंतिम लढतही शानदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. विजेत्या संघाला कोण चषक सुपूर्द करतो, कोणत्या राजकीय व्यक्ती अंतिम फेरीच्या वेळी उपस्थित आहेत, या सगळ्यापेक्षाही दर्जेदार खेळ पाहायला मिळणार का, हे महत्त्वाचे आहे,’’ असे फिफाच्या महिला विभागाच्या प्रमुख तातजाना हाइनेनी यांनी स्पष्ट केले.