स्टीपलचेस प्रकारात सुधा सिंगची रिओवारी पक्की; थाळीफेक प्रकारात कृष्णा पुनियाला सुवर्ण

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या ललिता बाबरने दिल्ली येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस प्रकारात स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. ललिताने विक्रमासहित सुवर्ण पदकाची कमाई केली. सुधा सिंगने रौप्य पदकावर नाव कोरताना स्टीपलचेस प्रकारात रिओवारी पक्की केली.

रिओ ऑलिम्पिकसाठी याआधीच पात्र ठरलेल्या ललिताने ९ मिनिटे, २७.०९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. सुधाने ९ मिनिटे आणि ३१.८६ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या ललिताने कामगिरीत आमूलाग्र सुधारणा करीत सरशी साधली. सुधा सिंगने मॅरेथॉन शर्यतीत रिओवारी पक्की केली होती. मात्र स्टीपलचेस प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी सुधाला शेवटची संधी होती. सुधाने संधीचे सोने करताना दुसरे स्थान पटकावले.

‘‘स्टीपलचेस प्रकारात मला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरायचे होते. मात्र २०१४ आशियाई स्पर्धेनंतर मी मॅरेथॉन प्रकारात खेळत असल्याने देशाबाहेरच्या स्पर्धाद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळत नव्हती. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी ही शेवटची स्पर्धा होती. रौप्य पदकासह स्टीपलचेस प्रकारासाठी रिओवारी पक्की झाल्याने आनंद झाला आहे,’’ असे सुधाने सांगितले.

पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत राजीव अरोकियाने ४५.४७ सेकंदांत शर्यत पूर्ण करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेला ४५.४० सेकंदांच्या वेळेचा निकष त्याला गाठता आला नाही. महिलांमध्ये अनिल्डा थॉमसने सुवर्ण पदक पटकावले. तिने एम. आर. पुवम्माला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

थाळीफेक प्रकारात महिलांमध्ये कृष्णा पुनियाने ५५.०९ अंतरावर थाळी फेकत सुवर्ण पदकावर कब्जा केला. संदीप कुमारीने रौप्य तर नवजीत कौर ढिल्लनने कांस्य पदक पटकावले. १५०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये ओ.पी. जैशाने सुवर्ण पदकावर नाव कोरले. ४ मिनिटे आणि १८.६९ सेकंदांत तिने शर्यत पूर्ण केली. पी.यू. चित्राने रौप्य तर आदेश कुमारीने कांस्य पदक मिळवले.