मुंबई मॅरेथॉन शर्यतीत महिला गटाचे जेतेपद पटकावणारी साताऱ्याची ललिता बाबर पदवीच्या परीक्षेमुळे हाँगकाँगमध्ये रविवारी होणाऱ्या १४व्या आशियाई मॅरेथॉन शर्यतीला मुकणार आहे. भारतातर्फे बिनिंग लिंगखोई हा एकमेव धावपटू पुरुष विभागात सहभागी होणार आहे. ‘‘पदवी परीक्षेला सुरुवात झाली असून ललिताने या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या शर्यतीत धावणार नसल्याचे तिने कळवले आहे,’’ असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे संचालक एम. एल. डोगरा यांनी सांगितले. २१ देशांतील ४१ अव्वल धावपटू आशियाई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. प्रत्येक देशातील अ‍ॅथलेटिक्स संघटनेने निवडलेले दोन धावपटू या शर्यतीत सहभागी होतील. आशियाई देशांव्यतिरिक्त अन्य धावपटूंना या शर्यतीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांचा निकाल जेतेपदाच्या शर्यतीत ग्राह्य़ धरला जाणार नाही.