श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला आहे. श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची तुलना ‘माकडा’सोबत केल्याने मलिंगा अडचणीत आला आहे. मलिंगाच्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील श्रीलंकेच्या संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांनी श्रीलंकन क्रिकेट संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांनी श्रीलंकन क्रिकेट संघावर जोरदार टीका केली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरीदेखील गाठू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांनी श्रीलंकन संघावर तोंडसुख घेतले. या टीकेला प्रत्युत्तर देताना मलिंगाने जयासेकेरा यांची तुलना थेट माकडाशी केली.

‘वादग्रस्त विधानाविषयी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची चौकशी करण्यात येणार आहे. मी टीका करताना खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा उल्लेख केला होता. खेळाडूंच्या तंदुरुस्तीबद्दल बोलताना मी मलिंगाचे नाव घेतले नव्हते. मात्र तरीही त्याने जाहीरपणे माझ्यावर टीका केली,’ असे क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांनी एएफपी या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले. मलिंगाने क्रीडामंत्र्यावर टीका करताना ‘खुर्ची गरम करणारे’, असे शब्द वापरले होते.

‘फक्त खुर्च्या गरम करणाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेची मला फिकीर नाही. माकडाला पोपटाच्या ढोलीविषयी काय माहिती असणार ? त्यांची टीका म्हणजे माकडाने पोपटाच्या ढोलीत येऊन ढोलीबद्दल बोलण्यासारखे आहे,’ अशा तिखट शब्दांमध्ये मलिंगाने क्रीडामंत्री दयासिरी जयासेकेरा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘क्रिकेटपटूंच्या शरीरात साधारणत: १६ टक्के चरबी असायला हवी. मात्र श्रीलंकन क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडूंच्या शरीरातील चरबीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे,’ असे जयासेकेरा यांनी म्हटले होते.

पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने श्रीलंकेला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून बाहेरचा रस्ता धरावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने २३० धावांचे आव्हान उभे केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदचे दोन झेल श्रीलंकेच्या खेळाडूंनी सोडले आणि त्यामुळेच श्रीलंकेचा पराभव झाला.