कसोटी मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिका जिंकून ‘फिनिक्सभरारी’ घेतली होती. परंतु मायदेशी परण्यापूर्वी इंग्लिश भूमीवरील अखेरची एकमेव ट्वेन्टी-२० लढत जिंकण्यात भारताला अपयश आले. अखेरच्या षटकात भारताला १७ धावांची आवश्यकता होती. परंतु धोनी मैदानावर असल्यामुळे भारत सहजगत्या जिंकणार अशी आशा होती. त्याने अपेक्षेप्रमाणे एक षटकार आणि चौकार ठोकून भारताच्या विजयाकडे वाटचालसुद्धा केली. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ५ धावा होत्या. धोनी षटकार खेचून भारताला जिंकून देईल, ही आशा मात्र फोल ठरली. त्याने फक्त एक  धावा काढली आणि इंग्लंडने ३ धावांनी हा सामना खिशात घातला. सात षटकारांसह अर्धशतकी खेळी साकारणारा कर्णधार ईऑन मार्गन इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यावर धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीला अखेर ट्वेन्टी-२० सामन्यात सूर गवसला. त्याने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह आपली ६६ धावांची खेळी साकारली. शिखर धवन, सुरेश रैना आणि धोनी यांनीसुद्धा आपले योगदान दिले. परंतु भारताला विजय साकारता आला नाही.
त्याआधी, मॉर्गनने ३१ चेंडूंत साकारलेल्या ७१ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने ७ बाद १८० धावांचे आव्हान उभारले. अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये मॉर्गनने जोरदार आतषबाजी केली. इंग्लंडने शेवटच्या पाच षटकांमध्ये ८१ धावा केल्या. अ‍ॅलेक्स हेल्स (२५ चेंडूंत ४० धावा), जो रूट (२६) आणि रवी बोपारा (१४ चेंडूंत नाबाद २१ धावा) यांनी इंग्लंडच्या धावसंख्येत महत्त्वाचे योगदान दिले. भारताचा पदार्पणवीर फिरकी गोलंदाज करण शर्माला (२८ धावांत १ बळी) खेळणे इंग्लंडला आव्हानात्मक ठरले, तर मोहम्मद शमीने ३८ धावांत ४ बळी घेतले. याशिवाय अजिंक्य रहाणेने चार सुरेख झेल टिपले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ७ बाद १८० (अ‍ॅलेक्स हेल्स ४०, ईऑन मॉर्गन ७१; मोहम्मद शमी ३/३८, करण शर्मा १/२८) विजयी वि. भारत : २० षटकांत ५ बाद १७७ (शिखर धवन ३३, विराट कोहली ६६, सुरेश रैना २५, महेंद्रसिंग धोनी नाबाद २७; स्टीव्हन फिन १/२८)
सामनावीर : ईऑन मॉर्गन.