जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानावर असलेल्या रॉजर फेडररच्या चतुरस्र खेळामुळेच युरोप इलेव्हनला लेव्हर चषक टेनिस लढतीत जागतिक इलेव्हनविरुद्ध विजय मिळवता आला.  फेडररने निक किर्गिओसवर ४-६, ७-६ (८-६), ११-९ असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला आणि आपल्या संघाला १५-९ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. याबाबत फेडरर म्हणाला, ‘‘दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये मला खेळाचा सूर सापडला. तेथूनच खऱ्या अर्थाने मी सामन्यावर नियंत्रण मिळविले. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील अंतिम सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर जे समाधान मिळते, तसे समाधान येथे मला या सामन्यानंतर झाले. किर्गिओस हा लढवय्या खेळाडू आहे. त्याने येथे खूप सुरेख खेळ केला.’’