लिव्हरपूलवर ३-१ विजय; व्हॅर्डीचे दोन गोल

क्लॉडिओ रानिइरी यांच्या हकालपट्टीमुळे प्रशिक्षकांविना खेळणाऱ्या लिस्टर सिटी संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलवर ३-१ असा विजय मिळवला.

गेल्या हंगामात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह लिस्टर सिटीने पहिल्यांदाच प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र या मोसमात कामगिरीत सातत्य राखता न आल्याने संघव्यवस्थापनाने ६५ वर्षीय प्रशिक्षक मार्गदर्शक रानिइरी यांची हकालपट्टी केली. संघाच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रानिइरी यांच्या हकालपट्टीचा संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होईल, अशी चिन्हे होती. मात्र दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर लिस्टर सिटीने सरशी साधली.

लिस्टर सिटीचा आधारस्तंभ असलेल्या जेमी व्हॅर्डीने २८व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल करत लिस्टच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. डॅनियल ड्रिंकवॉटरने ३९व्या मिनिटाला एक गोल केला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लिस्टर सिटीच्या चाहत्यांनी माजी व्यवस्थापक मार्गदर्शक रानिइरी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. लिव्हरपूलकडून ६८व्या मिनिटाला फिलीपे कौटिन्होने एकमेव गोल केला. यंदाच्या हंगामात स्वान्सी, मँचेस्टर युनायटेड, बर्नले आणि साऊदॅम्पटन यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर लिस्टर सिटीने विजय साकारला.