लिंबूटिंबू संघांमध्ये गणना होणारा लिसेस्टर सिटीचा संघ इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. मँचेस्टर युनायटेडविरुद्ध लिसेस्टर सिटीला बरोबरीत समाधान मानावे लागल्याने जेतेपदासाठी त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अँथनी मार्शलने   आठव्या मिनिटाला गोल करत मँचेस्टर युनायटेडचे खाते झटपट उघडले. मोठय़ा संघाविरुद्धच्या शेवटच्या दहा लढतीत लिसेस्टर सिटीने होऊ दिलेला हा पहिलाच गोल होता. लिसेस्टर सिटीचा कर्णधार वेस मॉर्गनने १७व्या मिनिटाला गोल करत चोख प्रत्युत्तर दिले. १-१ बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघांनी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे ठरले. सामना बरोबरीत सुटल्याने मँचेस्टर युनायटेडच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याच्या आशा अंधुक झाल्या आहेत. टॉटनहॅमला चेल्सीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्यास लिसेस्टर सिटीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब होईल. टॉटनहॅमने चेल्सीवर विजय मिळवल्यास लिसेस्टर सिटी संघाला घरच्या मैदानावर इव्हर्टन संघाला नमवत जेतेपद पटकावण्याची संधी आहे.  लिसेस्टर सिटीचा गोलरक्षक  कॅस्पर शिमीसेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने मँचेस्टर युनायटेडचे पाच गोलप्रयत्न रोखले.