फॉम्र्युला-वनच्या २०१४च्या मोसमावर मर्सिडीझ संघ अधिराज्य गाजवू लागला आहे. मर्सिडीझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने रविवारी चीन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावत या मोसमातील सलग तिसऱ्या जेतेपदाची नोंद केली. यासह हॅमिल्टनने कारकिर्दीत पहिल्यांदाच जेतेपदांची हॅट्ट्रिक साजरी केली.
पोल पोझिशनपासून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने संपूर्ण शर्यतीवर वर्चस्व गाजवत सहजपणे जेतेपदावर नाव कोरले. त्याचा सहकारी निको रोसबर्गने दुसरे स्थान पटकावल्यामुळे या मोसमात तिसऱ्यांदा मर्सिडीझच्या ड्रायव्हर्सनी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर येण्याची किमया साधली आहे. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने तिसरा येण्याचा मान पटकावला. रेड बुलचे ड्रायव्हर डॅनियल रिकार्डियो आणि सेबॅस्टियन वेटेल अनुक्रमे चौथे आणि पाचवे आले. हॅमिल्टनने ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत ७५ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे.
सहारा फोर्स इंडियाचे ड्रायव्हर निको हल्केनबर्ग आणि सर्जीओ पेरेझ यांनी पुन्हा एकदा सुरेख कामगिरीची नोंद केली. त्यांनी अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या क्रमांकावर मजल मारली. या कामगिरीमुळे फोर्स इंडियाने कंस्ट्रक्टर्स (सांघिक) अजिंक्यपद शर्यतीत तिसरे स्थान पटकावले आहे.