गतविजेत्या लुईस हॅमिल्टनने पाच शर्यतींमधील जेतेपदाचा दुष्काळ संपविताना चौथ्या विश्वविजेतेपदाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सोमवारी हॅमिल्टनने अमेरिकन ग्रा. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत जेतेपद पटकावून कारकीर्दीतला ५०वा विजय साजरा केला. जेतेपदांचे अर्धशतक पूर्ण करणारा हॅमिल्टन हा अ‍ॅलेन प्रोस्ट (५१) आणि मायकेल शूमाकर (९१) यांच्यानंतरचा तिसरा शर्यतपटू आहे.

या विजयामुळे मर्सिडिज संघाचा हॅमिल्टन विश्वविजेत्या शर्यतपटूंच्या यादीत ३०५ गुणांसह दुसऱ्या, तर संघसहकारी निको रोसबर्ग ३३१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यंदाच्या मोसमातील तीन शर्यती शिल्लक असून हॅमिल्टनला विजय मिळवणे आवश्यक आहे, परंतु रोसबर्ग या तिन्ही शर्यतीत दुसरे स्थान पटकावूनही हॅमिल्टनकडून विश्वविजेत्या शर्यतपटूचा मान हिसकावू शकतो. येथील अमेरिकास सर्किटवर झालेल्या शर्यतीत हॅमिल्टनने १ तास ३८ मिनिटे १२.६१८ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ रोसबर्गने ४.५२० सेकंदाने शर्यत पूर्ण करून दुसरे, तर रेड बुलच्या डॅनिएल रिकिआडरेने १९.६९२ सेकंदाने शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान जिंकले.

येथील सर्किट माझ्यासाठी नेहमी भाग्यवान ठरले आहे. अमेरिकेतील शर्यतीत खेळायला मला आवडते. संघाने घेतलेल्या मेहनतीचा अभिमान वाटतो.

– लुईस हॅमिल्टन