चीनने आता क्रीडाक्षेत्रही पादाक्रांत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ‘चिनी ड्रॅगन’ हळूहळू सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये हातपाय फैलावतोय, याची प्रचिती लि ना हिच्या दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदावरून आली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत डॉमिनिका सिबुलकोव्हा हिच्यावर ७-६ (७/३), ६-० असे वर्चस्व गाजवत लि ना हिने अजिंक्यपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी ती सर्वात वयस्कर खेळाडू ठरली.
सेरेना विल्यम्स, व्हिक्टोरिया अझारेंका या बलाढय़ खेळाडूंची जेतेपदावरील मक्तेदारी संपुष्टात आणत लि ना हिने दोन वेळा हुलकावणी दिलेल्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर मोहोर उमटवण्यात यश मिळवले. २०११ आणि २०१३मध्ये लि ना हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तीन वर्षांपूर्वी पटकावलेल्या फ्रेंच स्पर्धेच्या जेतेपदानंतर तिने आणखी एका ग्रँडस्लॅम जेतेपदाची भर घातली. मार्टिना नवरातिलोव्हा, बिली जीन किंग, ख्रिस इव्हर्ट आणि सेरेना विल्यम्स या वयाच्या तिशी ओलांडलेल्या विजेत्या खेळाडूंच्या यादीत लि ना हिने स्थान पटकावले. या विजेतेपदामुळे लि ना हिला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली आहे.
दोन वेळा विजेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे ३१ वर्षीय लि ना हिच्यावर प्रचंड दडपण होते. मात्र जिद्दीने खेळ करत लि ना हिने आपला अनुभव पणाला लावत ७० मिनिटे रंगलेल्या पहिल्या सेटवर नाव कोरले. पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतर लि ना हिने सिबुलकोव्हाला परतीच्या फटक्यांवर निष्प्रभ केले. अखेर ट्रायब्रेकरमध्ये ७-३ अशी बाजी मारत लि ना हिने सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट मात्र एकतर्फीच झाला. तिने स्लोव्हाकियाच्या सिबुलकोव्हाला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये तीन वेळा सिबुलकोव्हाची सव्‍‌र्हिस भेदत लि नाने ६-० अशी बाजी मारली.
अफाट ऊर्जा आणि नयनरम्य असे फटके लगावणाऱ्या सिबुलकोव्हाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठत सर्वाची मने जिंकली. या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत १३ स्थानांनी झेप घेतली.
ल्युकाझ क्युबोट-रॉबर्ट लिंडस्टेडट अजिंक्य
पोलंडच्या ल्युकाझ क्युबोट आणि स्वीडनच्या रॉबर्ट लिंडस्टेडटने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीने अमेरिकेच्या इरिक ब्युटोरॅक आणि दक्षिण आफ्रिकेच्या रावेन लासेन जोडीवर ६-३, ६-३ अशी मात करत जेतेपदाची कमाई केली. क्युबोट-लिंडस्टेड जोडीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.