अर्जेटिना अंतिम फेरीत; गोन्झॅलो हिग्वेनचे दोन गोल

लिओनेल मेस्सीच्या अद्वितीय प्रभावापुढे अमेरिकेचे आव्हान फिके पडले. जगातील सर्वोत्तम खेळाडूचा ‘फिफा’चा पुरस्कार पाच वेळा जिंकण्याची किमया साधणारा मेस्सी अर्जेटिनासाठी पुन्हा एकदा तारणहार ठरला. एक गोल आणि दोन गोलसाठी साहाय्य अशा मेस्सीच्या पराक्रमाच्या बळावर अर्जेटिनाने अमेरिकेवर ४-० असा दिमाखदार विजय मिळवून कोपा अमेरिका शतकमहोत्सवी फुटबॉल स्पध्रेची अंतिम फेरी गाठली. मेस्सीचा हा स्पध्रेतील पाचवा गोल ठरला.

मेस्सीने तिसऱ्या मिनिटाला ईझीक्वेल लॅव्हेझीला गोल साकारण्यास मदत केली. मग त्याने ३२व्या मिनिटाला अर्जेटिनाच्या गोलफलकावर दुसरा गोल झळकावला. हा त्याचा ५५वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. मग ५०व्या मिनिटाला गोन्झॅलो हिग्वेनने अमेरिकेच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणताना गोलरक्षक ब्रॅड गुझानला दुसऱ्या प्रयत्नात चकवून संघाचा तिसरा गोल नोंदवला. त्यानंतर ८६व्या मिनिटाला हिग्वेनने मेस्सीच्या पासवर चौथा गोल झळकावला.

१९९३च्या कोपा अमेरिकेनंतर आणि २००५मध्ये मेस्सीने पदार्पण केल्यापासून अर्जेटिनाला कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पध्रेचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यामुळे येत्या रविवारी न्यू जर्सी शहरातील मेटलाइफ स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम लढतीत जेतेपद पटकावण्यासाठी ते उत्सुक आहेत. या सामन्याला लॅव्हेझी मुकण्याची शक्यता आहे. ६०व्या मिनिटाला डिजिटल जाहिरातीच्या फलकावर पडल्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली.

कोपा अमेरिकेच्या शतकानिमित्त यंदा १६ राष्ट्रांची विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकेचा सर्वात आव्हानात्मक गटात समावेश होता. जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानावरील कोलंबियाचा गटात समावेश असतानाही अमेरिकेने बाद फेरी गाठली. मग उपांत्यपूर्व फेरीत फिफा क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेल्या इक्वेडरला नामोहरम केले.

मात्र  शुक्रवारी २९वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीच्या नेत्रदीपक खेळाच्या बळावर पहिल्या शिटीपासूनच अमेरिकेने शरणागती पत्करल्याचे दिसून आले. एनआरजी स्टेडियमवर संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या हजारो अमेरिकन फुटबॉलरसिकांची त्यामुळे घोर निराशा झाली. आता ग्लेनडेल येथे होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात अमेरिका खेळणार आहे.

मेस्सीने ब् मात्र २००५मध्ये फिफा युवा विश्व अजिंक्यपद स्पर्धा (२० वर्षांखालील) आणि २००८मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक वगळता मेस्सीला अर्जेटिनासाठी मोठे विजेतेपद मिळवून देता आलेले नाही.

२०१४च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जर्मनीने आणि मागील वर्षी कोपा अमेरिका स्पध्रेत चिलीने अर्जेटिनाला पराभूत केल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

अमेरिकेचे प्रशिक्षक जर्गन क्लिन्समन यांनी मध्यरक्षक कायले बेकरमन आणि ग्रॅहम झुसी यांच्यासह आक्रमणवीर ख्रिस वोंडोलोस्की यांना संघात स्थान दिले होते. कारण मध्यरक्षक जेर्मेनी जोन्स, अ‍ॅलेजँड्रो बेडोया आणि आघाडीवीर बॉबी वूड यांना या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. १७ वर्षीय ख्रिस्टियन पुलिसिक दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मैदानावर उतरला.

कोपा अमेरिकेची आणखी एकदा अंतिम फेरी गाठल्याचा अतिशय आनंद होतो आहे. पहिल्या दिवसापासूनच आम्ही खेळावर छाप पाडली आहे. त्यामुळे जेतेपदावर आमचाच हक्क असेल.

– लिओनेल मेस्सी, अर्जेटिना