लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना ४०० गोल्सची नोंद करत रविवारी ला लीगा फुटबॉल स्पध्रेच्या लढतीत व्हॅलेन्सियाचा २-० असा पराभव केला. या विजयाबरोबर बार्सिलोनाने ला लीगाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला लुइस सुआरेझने बार्सिलोनासाठी गोल केला. मेस्सीने दिलेल्या पासवर सुआरेझने खाते उघडले. मात्र या संपूर्ण लढतीत व्हॅलेन्सियाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाही. पहिल्या सत्रामध्ये व्हॅलेन्सियाच्या दानी
पॅरेजोला मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आले आणि मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाने १-० अशी आघाडी कायम राखली होती. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी अप्रतिम बचाव केला, मात्र अगदी अखेरच्या सेकंदाला मेस्सीने नेयमारच्या पासवर गोल करून बार्सिलोनला तीन गुणांची कमाई करून दिली.k06 व्हॅलेन्सियायाला पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.  
मात्र दुसरीकडे रिअल माद्रिदने रात्री उशिरा झालेल्या लढतीत मालगा संघावर ३-१ असा विजय साजरा करून बार्सिलोना आणि त्यांच्यातील असलेला गुणांचा फरक दोनने कमी केला. सर्जिओ रामोस (२४ मि.), जे. रॉड्रिग्ज (६९ मि.) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (९० मि.) यांनी माद्रिदसाठी प्रत्येकी एक गोल केला, तर मालगासाठी जुआन्मीने (७१ मि.) एकमेव गोलची नोंद केली. अ‍ॅटलेटिको माद्रिदनेही अँटोइने ग्रिएजमन्नच्या दोन गोलच्या बळावर डेपोर्टीव्हो ला कोरूना संघावर २-१ असा विजय मिळवला.

चारशे गोलपेक्षा तीन गुण महत्त्वाचे -मेस्सी
२००५मध्ये मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना अल्बासेटेविरुद्ध पहिल्या गोलची नोंद केली होती आणि २०१५मध्ये त्याने ४०० गोल्स करण्याची किमया केली. हा गोल्सचा आकडा आणखीन वाढविण्याचा मानस मेस्सीने बोलून दाखविला आहे. तो म्हणाला, ‘‘बार्सिलोनाकडून चारशे गोल मी केले आणि आशा करतो याहून अधिक करण्यात यश मिळेल. या विक्रमाहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे आव्हानात्मक लढतीत आम्ही तीन गुण मिळवले.’’