अर्जेटिनाची होंडुरासवर १-० अशी मात
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आयोजित सराव लढतीत अर्जेटिनाने होंडुरासवर १-० अशी मात केली. लढतीदरम्यान लिओनेल मेस्सी दुखापतग्रस्त झाल्याने अर्जेटिना व्यवस्थापनाच्या चिंता वाढल्या आहेत. गोन्झालो हिग्युेनच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेटिनाने विजय मिळवला.
मध्यंतरानंतरच्या सत्रात पाठीचे दुखणे बळावल्याने मेस्सीला मैदान सोडावे लागले. ५९व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी खेळाडूशी झालेली टक्कर मेस्सीसाठी चिंतेचे कारण ठरले. या अपघातानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी मेस्सीवर उपचार केले. मात्र दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेस्सीच्या दुखापतीविषयी आता काही सांगणे कठीण आहे. लवकरच त्याचे स्वरूप समजेल असे अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिन्हो यांनी सांगितले. मेस्सी दुखापतीतून न सावरल्यास कोपा अमेरिका स्पर्धेच्या चिलीविरुद्धच्या लढतीत अर्जेटिनाचे आव्हान कमकुवत होण्याची शक्यता आहे.
बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करणारा मेस्सी दोन महिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर होता. २३ वर्षांनंतर मोठय़ा स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी आतुर अर्जेटिनासाठी मेस्सी डावपेचाचा मुख्य भाग आहे.