बार्सिलोनाचा गेटाफेवर ६-० असा दणदणीत विजय
बार्सिलोना आणि लिओनेल मेस्सी हे समीकरण साऱ्या जगाला पाठ झाले आहे. मेस्सीच्या कर्तृत्वाच्या जोरावर बार्सिलोनाने अनेक जेतेपदे पटकावली आणि त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने बार्सिलोनाची वाटचाल सुरू आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या सामन्यात बार्सिलोनाने ६-० अशा फरकाने गेटाफेवर दणदणीत विजयाची नोंद केली. याही विजयामध्ये मेस्सीचा ‘मिडास’ स्पर्श संघाच्या उपयोगी आला. एक गोल करताना मेस्सीने तीन गोलांसाठी साहाय्य करत विजयात निर्णायक भूमिका बजावली. नेयमारने दोन गोल केले, तर मुनील हद्दादी आणि अ‍ॅड्रा तुरॅन यांनी एक गोल केला.
कॅम्प नोऊ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आठव्या मिनिटाला गेटाफेच्या जुआन रॉड्रिग्जच्या स्वयंगोलने बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ११व्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट करण्याची संधी होती, परंतु मेस्सीला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. आठ मिनिटांनंतर मात्र हद्दादीने मेस्सीच्या पासवर गोल करून बार्सिलोनाची आघाडी २-० अशी केली. ३२व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर नेयमारने गोल केला आणि ४०व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून पहिल्या सत्रात बार्सिलोनाला ४-० असे आघाडीवर ठेवले.
दुसऱ्या सत्रातही मेस्सीने सहकाऱ्यांना सोबत घेऊन गोलसपाटा कायम राखण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ५१व्या मिनिटाला नेयमारने दुसऱ्या गोलची नोंद केली, तर ५७व्या मिनिटाला तुरॅनने गोल करत बार्सिलोनाची आघाडी ६-० अशी भक्कम केली. उर्वरित तीस मिनिटांच्या खेळात बार्सिलोनाने सातत्यपूर्ण खेळ करताना सामन्यात ६-० असा विजय निश्चित केला. या विजयाने बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पध्रेच्या दिशेने आगेकूच कायम राखली आहे. दुसऱ्या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदने ३-० अशा फरकाने डेपोर्टीव्हो ला कोरूना क्लबचा पराभव करून बार्सिलोनावर दडपण कायम राखले आहे.