कर चुकवल्याप्रकरणी न्यायालयाचा आदेश
जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असे बिरुद मिरवणारा अर्जेटिनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्याच्या वडिलांना एका करविषयक खटल्याच्या सुनावणीसाठी मंगळवारी बार्सिलोना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. स्पेनमधील ४० लाख युरो रकमेवर कर न भरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बार्सिलोनाच्या यशात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आणि पाच वेळा जगातील जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब जिंकणाऱ्या मेस्सीसह त्याच्या वडिलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागणार आहे. जून २०१३ मध्ये हा खटला त्यांच्यावर भरण्यात आला होता. २ जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी चालणार आहे. त्यानंतर ३ जूनला मेस्सी अर्जेटिना संघासोबत कोपा अमेरिका स्पध्रेसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे.
२००७ ते ०९ या कालावधीत व्यावसायिक अधिकारापोटी मेस्सीने ४१ लाख ६० हजार युरोंची कमाई केली होती. मात्र यावरील कर चुकवण्यासाठी मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज होराकिओ मेस्सी यांनी बेलिझ आणि उरुग्वे या देशांमध्ये बनावट कंपन्या निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या खटल्यात मेस्सी पिता-पुत्र दोषी आढळल्यास त्यांना अडीच महिन्यांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची शिक्षा होईल.