ऑस्ट्रेलियाविरुद्धची धरमशाला कसोटी जिंकून भारतीय संघ मालिका विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव १३७ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात बिनबाद १९ धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी उद्याच्या दिवसात केवळ ८७ धावांची गरज आहे.

कसोटीच्या तिसऱया दिवसाशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताचा पहिला डाव ३३२ धावांवर आटोपला होता. भारताला ३२ धावांची किरकोळ आघाडी घेता आली. पण प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दुसऱया डाव्यात ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के दिले. उमेश यादवने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेव्हिड वॉर्नर(६) आणि रेनशॉ(८) यांना चालते केले. तर दमदार फॉर्मात असलेल्या स्टीव्ह स्मिथचा(१७) काटा भुवनेश्वर कुमारने दूर केला. भुवनेश्वरने स्मिथला त्रिफळाचीत केले. दुसऱया सत्रात देखील भारतीय गोलंदाजांचा वरचष्मा राहिला. अश्विनच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकोम्बच्या बॅटला कडा घेऊन गेलेला चेंडू अजिंक्य रहाणेने स्लिपमध्ये अफलातून टीपला आणि भारताला चौथे यश मिळाले. पुढच्याच षटकात जडेजाने शॉन मार्शला चालते केले. ९२ धावांवरच ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत दाखल झाले होते. मग मॅक्सवेलने डाव सारवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यालाही अश्विनने ४५ धावांवर पायचीत केले. जडेजाने आणखी एक धक्का देत कमिन्सला झेलबाद केले. त्यानंतर जडेजाने ओकिफला, तर उमेश यादवने नॅथन लियॉनला शून्यावर माघारी धाडले. अश्विनने शेवटची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव १३७ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ १०६ धावांची कमकुवत आव्हान मिळाले.

 

तत्पूर्वी, यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा आणि रवींद्र जडेजा यांच्या ९६ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर आघाडी घेता आली. जडेजाने यावेळीही अष्टपैलू कामगिरी करत ६३ धावा ठोकल्या, तर साहाने ३१ धावांचे योगदान दिले. जडेजा बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला भुवनेश्वर कुमार खातेही न उघडता माघारी परतला. तर कुलदीप यादव ७ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉने ५ विकेट्स घेतल्या. कमिन्सने तीन फलंदाजांना माघारी धाडले, तर हेजलवूड आणि ओकफी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या ३०० धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात दुसऱया दिवसाच्या अखेरीस ६ बाद २४८ अशी मजल मारली होती. चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलची अर्धशतके दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्ये ठरली. दुसऱ्या दिवसात भारताने संथगतीने फलंदाजी केली. पहिल्या सत्राचा खेळ सुरु होताच ११ व्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज हेझलवूडने मुरली विजयला बाद करत भारताची सलामीची जोडी फोडली, तेव्हा भारताच्या केवळ २१ धावा झाल्या होत्या. विजय तंबूत परतल्यावर चेतेश्वर पुजाराने राहुलला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या सत्रात आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या सत्राअखेरीस भारताने १ बाद ६४ अशी मजल मारली होती.