भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरील भारतीय संघाची ही ५०० कसोटी होती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने या कसोटीवर विजयी मोहोर उमटवली आहे. दोन्ही डावात मिळून अश्विनने एकूण १० विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात ६ विकेट्स जमा झाल्या. न्यूझीलंडकडून ल्यूक राँचीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले, तर सँटनरनेही (७१) चांगली झुंज दिली. अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला.

कसोटीच्या पाचव्या दिवशी मैदानात जम बसवलेले न्यूझीलंडची ल्यूक राँची आणि मिचेल सँटनर जोडी फोडण्यात भारतीय संघाला आजच्या दिवसातील २१ व्या षटकानंतर यश आले होते. रवींद्र जडेजाने भारतीय संघाला पाचवे यश मिळवून दिले. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या नादात राँची ८० धावांवर झेलबाद झाला. राँची आणि सँटनर यांनी शतकी भागीदारी रचली. राँची बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या भेदक माऱयाने बी.जे.वॉल्टिंग याला १८ धावांवर पायचीत केले, तर मार्क क्रेग याचा त्रिफळा उडवून त्याला स्वस्तात माघारी धाडले. उपहारापर्यंतच्या आकडेवारीनुसार न्यूझीलंडच्या ७ विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे भारताने जवळपास कसोटी आपल्या खिशात टाकली होती. उपहारानंतरच्या खेळात फक्त भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनने उपहारानंतर अफलातून फिरकीच्या जोरावर किवींना नामोहरम केले आणि कसोटी १९७ धावांनी जिंकली.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

तत्पूर्वी, चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडला चार फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९३ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. सामन्याच्या चौथ्या दिवसात आर. अश्विनने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले होते, तर उमेश यादवने सीमा रेषेवरून दिलेल्या अचूक थ्रोवर रॉस टेलर धावचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ल्यूक राँची ३८ धावांवर , तर मिचेल सँटनर ८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला दुसरा डाव ५ बाद ३७७ धावांवर घोषित करून किवींसमोर ४३९ धावांचे आव्हान उभे केले. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाच्या तुफानी खेळीने भारताला चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच ३७५ चा पल्ला ओलांडता आला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनी अर्धशतकी खेळी करत दुस-या डावात भारताला दमदार सुरुवात केली होती. मात्र विराट कोहली १८ धावांवर माघारी परतल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी ४० धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. अजिंक्य रहाणेने ८१ चेंडूत ४० धावा केले. यात चार चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारताची मदार होती. गेल्या काही सामन्यात सूर सापडत नसल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रोहित शर्माला शेवटी आज सूर गवसला. रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या साथीने किवी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनीही चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने ५८ चेंडूत ५० धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या असताना विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. न्यूझीलंडतर्फे सँटनर आणि इश सोधी या दोघांनी प्रभावी मारा केला. या दोघांनी प्रत्येक दोन गडींना बाद केले. तर मार्क क्रेगने एक विकेट घेतली.

India (Ind) vs New Zealand (NZ) – दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
13:40 (IST) 26 Sep 2016
अर्धशतकी खेळी आणि कसोटी सहा विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा ठरला सामनावीर
12:56 (IST) 26 Sep 2016
न्यूझीलंडचा संघ २३६ धावांमध्ये गारद, भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकली
12:54 (IST) 26 Sep 2016
न्यूझीलंडची शेवटची विकेट अश्विनच्या नावावर, भारतीय संघाची ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर
12:52 (IST) 26 Sep 2016
८७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ९ बाद २३६ धावा. (बोल्ट- २, वँगर- ० )
12:49 (IST) 26 Sep 2016
अश्विनच्या फिरीकीवर किवींची भंबेरी, न्यूझीलंड ९ बाद २३६
12:44 (IST) 26 Sep 2016
भारतीय संघ ऐतिहासिक विजायापासून केवळ १ विकेट दूर
12:44 (IST) 26 Sep 2016
अश्विनची अफलातून फिरकी, इश सोधी त्रिफळाबाद
12:41 (IST) 26 Sep 2016
इश सोधीचा अश्विनला डीप स्वेअर लेगच्या दिशने उत्तुंग षटकार, न्यूझीलंड ८ बाद २३६
12:41 (IST) 26 Sep 2016
जडेजाकडून निर्धाव षटक, न्यूझीलंड ८ बाद २३० (सोधी- ११, बोल्ट- २)
12:40 (IST) 26 Sep 2016
जडेजाचा आणखी एक सुंदर स्विंग, न्यूझीलंड ८ बाद २३०
12:40 (IST) 26 Sep 2016
बोल्टच्या पॅडला चेंडू आदळला, पायचीत झाल्याची अपील. पण पंचांचा नकार
12:39 (IST) 26 Sep 2016
रवींद्र जडेजा टाकतोय नवीन चेंडूवरील पहिले षटक
12:39 (IST) 26 Sep 2016
८० षटकांचा खेळ संपल्याने भारतीय संघाला नवीन चेंडू स्विकारण्याची संधी, भारताने ८३ व्या षटकात नवीन चेंडू स्विकारला
12:38 (IST) 26 Sep 2016
८२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २३०/८ (बोल्ट- २, सोधी- ११)
12:38 (IST) 26 Sep 2016
ट्रेंट बोल्टचा स्विप शॉट, पण केवळ एका धावेवर समाधान
12:37 (IST) 26 Sep 2016
पॉईंटवर रवींद्र जडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण, न्यूझीलंड २२९/८
12:36 (IST) 26 Sep 2016
इश सोधीचा अश्विनच्या फूलटॉसवर स्वेअर लेगच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड ८ बाद २२८ धावा
12:35 (IST) 26 Sep 2016
इश सोधी पायचीत झाल्याची अश्विनची अपील, पण पंचांचा नकार
12:32 (IST) 26 Sep 2016
भारती संघाला आता विजयासाठी केवळ दोन विकेट्स गरज, न्यूझीलंड ८ बाद २२४
12:32 (IST) 26 Sep 2016
अश्विनच्या फिरकी खेळताना सँटनरच्या बॅटला कट लागून चेंडू थेट सिली पॉईंटला उभ्या असललेल्या रोहित शर्माच्या हातात विसावला
12:30 (IST) 26 Sep 2016
अश्विनने घेतली सँटनरची विकेट, भारत विजयाच्या उंबरठ्यावर
12:30 (IST) 26 Sep 2016
न्यूझीलंडला ८ वा धक्का, सँटनर ७१ धावांवर झेलबाद; रोहित शर्माने टिपला झेल
12:25 (IST) 26 Sep 2016
७८ व्या षटकात केवळ एक धाव, न्यूझीलंड २२०/७
12:25 (IST) 26 Sep 2016
अश्विनच्या चेंडूवर इश सोधी पायचीत झाल्याची भारतीय जोरदार अपील, पंचांचा नकार
12:22 (IST) 26 Sep 2016
७७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २१९/७ (सँटनर- ६७, सोधी- ६ )
12:21 (IST) 26 Sep 2016
सोधीचा फाईन लेगच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड २१९/७
12:20 (IST) 26 Sep 2016
७६ व्या षटकाच्या अखेरीस न्यूझीलंड २१५/७ (सँटनर- ६७ , सोधी- २)
12:18 (IST) 26 Sep 2016
सँटनरच कव्हर पॉईंटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड ७ बाद २१५
12:17 (IST) 26 Sep 2016
७५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २११ धावा, न्यूझीलंडला विजयासाठी २२३ धावांची गरज
12:16 (IST) 26 Sep 2016
अश्विननंतर रवींद्र जडेजा टाकतोय षटक, जडेजाच्या दुसऱया चेंडूवर सँटनरचा चौकार
12:14 (IST) 26 Sep 2016
अश्विनच्या पहिल्या षटकात केवळ १ धाव, न्यूझीलंड ७ बाद २०६ धावा
12:12 (IST) 26 Sep 2016
सँटनर बचावला, तिसऱया पंचांकडून नॉट आऊटचा निर्णय
12:12 (IST) 26 Sep 2016
पहिल्याच चेंडूवर स्टपिंगसाठीची अपील, निर्णय तिसऱया पंचांकडे
12:11 (IST) 26 Sep 2016
उपहारानंतरच्या खेळाला सुरूवात, अश्विन टाकतोय उपहारानंतरचे पहिले षटक
11:32 (IST) 26 Sep 2016
उपहारापर्यंत न्यूझीलंड ७ बाद २०५ धावा, भारतीय संघाला विजयासाठी ३ विकेट्सची गरज
11:31 (IST) 26 Sep 2016
उपहाराची वेळ, पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाने मिळवले तीन विकेट्स
11:31 (IST) 26 Sep 2016
जडेजाच्या षटकात केवळ १ धाव, न्यूझीलंड ७ बाद २०५ धावा
11:29 (IST) 26 Sep 2016
सँटनर सुरक्षित, तिसऱया पंचांचा नाबादचा निर्णय
11:29 (IST) 26 Sep 2016
जडेजाचा चेंडू समजण्यात सँटनरला अपयश, साहाकडून स्टपिंग. निर्णय तिसऱया पंचांकडे
11:28 (IST) 26 Sep 2016
शमीच्या वेगवान माऱयानंतर रवींद्र जडेजाचा फिरकी मारा
11:27 (IST) 26 Sep 2016
७२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २०४. (सँटनर- ५६ , सोधी- २ )
11:26 (IST) 26 Sep 2016
शमीचा उत्तम यॉर्कर, न्यूझीलंड ७ बाद २०४
11:25 (IST) 26 Sep 2016
सँटनरचा मिड विकेटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंडने २०० धावांचा टप्पा ओलांडला
11:19 (IST) 26 Sep 2016
खेळपट्टीचा नूर बदललेला पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमीकडून भन्नाट रिव्हर्स स्विंग
11:16 (IST) 26 Sep 2016
क्रेग बाद झाल्यानंतर इश सोधी फलंदाजीसाठी मैदानात
11:16 (IST) 26 Sep 2016
क्रेग केवळ १ धाव करून तंबूत दाखल, भारतीय संघाला विजयासाठी केवळ ३ विकेट्स गरज
11:12 (IST) 26 Sep 2016
राऊंड द विकेटवरून गोलंदाजी करत मोहम्मद शमीचा रिव्हर्स स्विंग आणि अचूक त्रिफळावेध
11:12 (IST) 26 Sep 2016
मोहम्मद शमीचा अफलातून चेंडू, मार्क क्रेगचा त्रिफळा उडवला
11:09 (IST) 26 Sep 2016
मिचेल सँटनरचे अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंड ६ बाद १९५