द.आफ्रिकेविरुद्धच्या दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सुरूवातीच्या पडझडीनंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाला बिकट अवस्थेतून बाहेर काढले. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतके झळकावताना भारताला तब्बल ४०३ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या ४ बाद १९० अशी होती. विराट कोहलीने सध्या ८२ धावांवर नाबाद असून त्याच्या शतकासाठी अवघ्या १८ धावांची गरज आहे . तर दुसरीकडे अजिंक्य रहाणे दिवसअखेर ५२ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी ४ बाद ५७ अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. 

तत्पूर्वी दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची आफ्रिकेच्या तिखट माऱ्यापुढे पडझड होताना दिसली. आफ्रिकेच्या मॉनी मॉर्केलने सकाळच्या सत्रातच सलामीवीर मुरली विजयला ३ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, मॉर्केलने त्याला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद ८ अशी झाली होती. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॉर्केलने धवनला बाद करीत भारताला आणखी एक धक्का दिला, त्यानंतर इम्रान ताहिरने चेतेश्वर पुजाराचा अडथळा दूर केला.
तत्पूर्वी चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यावर नियंत्रण प्रस्थापित करताना २१३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. जडेजाने आपल्या लाजवाब फिरकीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ फक्त ३० धावांत गारद केला. त्यामुळे ४९.३ षटकांत त्यांचा डाव १२१ धावांत आटोपला होता.