दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या व अंतिम कसोटीच्या चौथ्या दिवशी आज द.आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमलाच्या कूर्मगती फलंदाजीमुळे भारताचा विजय लांबणीवर गेला आहे.  भारताच्या ४८१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसअखेर तब्बल ७२ षटकांमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्या आहेत. आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी आणखी ४०९ धावांची गरज आहे. कर्णधार हाशिम आमला (२३) व एबी डी व्हिलियर्स (११) खेळपट्टीवर आहेत. आमला याने २०७ चेंडूंचा सामना करत नाबाद २३ धावा जमविल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका डीन एल्गरच्‍या रूपात बसला. त्‍याला आर. अश्विनने रहाणेच्‍या हातून झेलबाद केले. बायूमा यालाही आश्‍विनने बोल्‍ड केले. बायूमा ११७ चेंडूंमध्‍ये ३४ धावा काढून बाद झाला. त्याआधी, रहाणेने पहिल्या डावामध्ये २१५ चेंडूमध्ये ११ चौकार आणि चार षटकारांसह १२७ धावा काढून दमदार शतक झकळवले होते. दुस-या डावातही रहाणेने २०८ चेंडूसह आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद शतक झळकावले. रहाणेच्या शतकानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव २६७ धावांवर घोषित करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान ठेवले. सामन्याचा आता उद्या शेवटचा दिवस असून भारतास विजयासाठी आणखी आठ बळी मिळविणे आवश्‍यक आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेमध्ये भारताने याआधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.