गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीचा अवघ्या ६७ धावांमध्ये खुर्दा उडवल्यावर पंजाबच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पंजाबने दिल्लीविरुद्धचा सामना १० विकेट्स राखून सहजपणे जिंकला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा सलामीवीर मार्टिन गप्टीलने वेगवान अर्धशतक झळकावत संघाला सफाईदार विजय मिळवून दिला. अवघ्या आठ षटकांमध्ये दिल्लीचे आवाहन पार करत पंजाबने दोन गुणांसह नेट रन रेटमध्येही सुधारणा केली.

अवघ्या ६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबने सावध सुरुवात केली. सलामीवीर हाशिम अमलाने मोठे फटके मारणे टाळले. मात्र दुसऱ्या बाजूने मार्टिन गप्टिल दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. २७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत गप्टिलने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गोलंदाजांपाठोपाठ पंजाबचे फलंदाजादेखील चमकदार कामगिरी करत असताना दिल्लीने दोन्ही विभागांमध्ये अतिशय खराब कामगिरी केली. दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला छाप पाडता आली नाही. त्यामुळे पंजाबचा विजय सुकर झाला.

तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात दिल्लीचा सलामीवीर बिलिंग्जला बाद करत संदीप शर्माने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. तिसऱ्या षटकात संदीपने संजू सॅमसनला माघारी धाडत दिल्लीला दुसरा धक्का दिला. दिल्लीच्या तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला. मात्र एकाही फलंदाजाला २० च्या पुढे धावा करता आल्या नाहीत.

संदीप शर्माने सलामीवीरांना झटपट माघारी पाठवल्यावर अक्षर पटेल, वरुण अॅरॉन, ग्लेन मॅक्सवेल यांनी दिल्लीची मधली फळी कापून काढली. पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांवरील दडपण कायम ठेवले आणि याच दडपणाखाली दिल्लीची फलंदाजी ढेपाळली. दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावत २० धावांमध्ये ४ विकेट्स घेणाऱ्या संदीप शर्माला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.