रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बंगळुरु संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला बंगळुरु संघ १०० धावाही करू शकला नाही. कर्णधार कोहलीची अर्धशतकी खेळी वगळता एकाही खेळाडूला धावा करता आल्या नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्मिथच्या नेतृत्वाखालील पुणे संघाला कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीसाठी निमंत्रित केले आहे. रहाणे आणि राहुल त्रिपाठी या सलामीच्या जोडीने सावध सुरुवात केली. मात्र, वैयक्तिक ६ धावांवर खेळत असताना रहाणे बद्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर स्मिथ मैदानावर आला. त्रिपाठीचा खेळ उंचावत होता. त्याला स्मिथ चांगली साथ देत होता. पण नेगीने त्रिपाठीला झेलबाद करून पुणे संघाला दुसरा झटका दिला. त्रिपाठीने ३७ धावा केल्या. कर्णधार स्मिथने तुफान फटकेबाजी करत पुण्याला शंभरीपार नेले. स्मिथ घरच्या मैदानावर मोठी खेळी करील, असे वाटत असतानाच वैयक्तिक ४५ धावांवर तो झेलबाद झाला. ३ बाद १०८ धावा असताना महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. त्याने सुरेख खेळ करत धावफलक हलता ठेवला. मनोज तिवारीने चांगली फटकेबाजी केली. मनोज तिवारीने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ चेंडूंमध्ये ४४ धावांची नाबाद खेळी केली. तर धोनीनेही एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ चेंडूंत २१ धावा केल्या. या दोघांनी ४९ धावांची भागिदारी केली. त्यांच्या भागिदारीच्या जोरावर पुण्याच्या संघाने बंगळुरुसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवले.

पुण्याचे १५८ धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या बंगळुरु संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. कोहलीसोबत सलामीला आलेला हेड स्वस्तात माघारी परतला. त्याने फक्त दोन धावा केल्या. आक्रमक खेळीसाठी नावाजलेला डिव्हिलियर्स मैदानावर आला. सुरुवातीपासूनच तो चाचपडत होता. अखेर  फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर झेल देऊन तो तंबूत परतला. त्याने ८ चेंडूंत अवघ्या तीन धावा केल्या. डिव्हिलियर्सनंतर आलेला केदार जाधव धावबाद झाला. कर्णधार एका बाजूने खिंड लढवत असला तरी, त्याचे सहकारी तंबूत परतत होते. संघाच्या ४८ धावा असताना निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर बंगळुरुचा एकही फलंदाज अधिक वेळ मैदानावर तग धरू शकला नाही. कोहली अर्धशतकी (५५) खेळी करून झेलबाद झाला. बंगळुरु संघाला अवघ्या ९६ धावाच करता आल्या.