20 October 2017

News Flash

अमिन गॉयरी.. फ्रान्सचा पुन्हा तारणहार!

जपानवर निसटता विजय मिळवून दुसऱ्या फेरीत स्थान

पीटीआय, गुवाहाटी | Updated: October 12, 2017 3:03 AM

जपानवर निसटता विजय मिळवून दुसऱ्या फेरीत स्थान

अमिन गॉयरीला लिओनेल मेस्सीचा वारसदार म्हटले जाते, याचाच प्रत्यय घडवत त्याने दोन गोल केले. त्यामुळेच फ्रान्स संघाने जपानवर २-१ असा निसटता विजय नोंदवून कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

दुसऱ्या फेरीतील प्रवेश बुधवारीच निश्चित करण्यासाठी फ्रान्सला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यांनी पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा हा पहिला गोल गॉयरीने १३व्या मिनिटाला नोंदवला. उत्तरार्धात सामन्याच्या ७१व्या मिनिटाला पुन्हा त्याने आणखी एक गोल केला व संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांना हा आनंद फार वेळ घेता आला नाही. त्यानंतर दोनच मिनिटांनी जपानला पेनल्टी किकची हुकमी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत तायसेई मियाशिरोने गोल केला व सामन्यात उत्सुकता निर्माण केली.

गॉयरीच्या कामगिरीमुळे स्पर्धेतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने न्यू कॅलेडोनियाला ७-१ अशी धूळ चारली होती. त्या वेळी गॉयरीने दोन गोल केले होते. जपानविरुद्ध पुन्हा तोच फ्रान्सचा तारणहार ठरला. त्याने दोन गोल केले, पण त्याचबरोबर त्याने अन्य सहकाऱ्यांनाही चांगले पासेस मिळवून दिले. दुर्दैवाने त्याच्या सहकाऱ्यांनी अचूकतेच्या अभावी या संधी वाया घालवल्या. जपानच्या खेळाडूंना उत्तरार्धात सूर गवसला. त्यांनी चांगल्या चाली करीत फ्रान्सवर दडपण आणले होते. फ्रान्सने दुसरा विजय नोंदवत सहा गुणांसह साखळी गटात आघाडी राखली आहे.

First Published on October 12, 2017 3:03 am

Web Title: live updates u 17 world cup football france vs japan