बाद फेरी गाठण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत इराकने चिली संघाचा ३-० असा सहज पराभव केला व कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आव्हान राखले. त्यांचा हा पहिला विजय आहे. इराकचा हुकमी खेळाडू मोहम्मद दाऊदने दोन गोल करीत इराकच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली, मात्र त्याने हॅट्ट्रिकची संधी वाया घालवली.

सामन्याच्या आठव्या मिनिटालाच दाऊदने संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात त्यांना या एकमेव गोलावर समाधान मानावे लागले. उत्तरार्धात सामन्याच्या ६८व्या मिनिटाला पुन्हा दाऊदने सुरेख फटका मारून संघाचा दुसरा गोल नोंदवला. त्यांची आघाडी कमी करण्यासाठी चिली संघाकडून चांगले प्रयत्न झाले. परंतु त्यांचा भरवशाचा खेळाडू दिएगो व्हॅलेन्सियाने ८१व्या मिनिटाला नजरचुकीने स्वत:च्या गोलपोस्टमध्ये चेंडू तटवला. ९०व्या मिनिटाला इराकला पेनल्टी किकची संधी मिळाली, मात्र दाऊदला त्याचा लाभ घेता आला नाही.

इराकने पहिल्या सामन्यात मेक्सिकोला १-१ असे बरोबरीत रोखले होते. या सामन्यातील त्यांचा एकमेव गोल दाऊदनेच केला होता. चिलीविरुद्धही त्यानेच प्रभावी कौशल्य दाखवले. त्याला अन्य सहकाऱ्यांकडून आणखी साथ मिळाली असती तर चिली संघावर त्यांनी किमान सहा गोलने विजय मिळवला असता.