गतउपविजेत्या मालीने नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. किवींकडून एक गोल झाला, परंतु त्यांच्या खेळात ढिसाळपणा होता. शारीरिक तंदुरुस्तीत न्यूझीलंडचे खेळाडू मालीवर भारी होते. तरीही मालीच्या खेळाडूंची चतुर खेळाची रणनीती वापरताना चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा राखला. सोबतच त्यांनी न्यूझीलंडच्या पेनल्टी क्षेत्रावर सातत्याने आक्रमण करत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. त्यांना लवकर यश मिळाले. सलाम जिडोऊने ३० यार्डावरून चेंडू गोलजाळीच्या दिशेने अचूक टोलवत मालीला १८व्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४३व्या मिनिटाला डेमॉसा ट्राओरे गोल करण्याच्या अगदी समीप पोहोचला होता, परंतु त्याने टोलावलेला चेंडू गोलखांब्यावर आदळला.

मध्यंतरानंतर मालीने त्वरित आणखी एक गोल करत भक्कम आघाडीच्या दिशेने कूच केली. डेमॉसा ट्राओरेने चपळाईने न्यूझीलंडच्या खेळाडूंना चकवत मालीसाठी दुसऱ्या गोलची नोंद केली. ०-२ अशा पिछाडीनंतर न्यूझीलंड दमदार खेळ करणे अपेक्षित होते, परंतु त्यांना मालीच्या खेळाडूंनी चेंडूवर ताबा मिळवूच दिला नाही. जस्ट एलिजाहने डाव्या कॉर्नरवरून टोलावलेल्या चेंडूला बदली खेळाडू चार्ल्स स्प्रॅगने हेडरद्वारे गोलजाळीत धाडले. मात्र अवघ्या दहा मिनिटांत मालीकडून याला प्रत्युत्तर मिळाले. लसाना नदियेने गोल करून मालीची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. या आघाडीनंतरही मालीने आक्रमण अखेपर्यंत सुरूच ठेवला.

 

अमेरिकेला नमवून कोलंबिया बाद फेरीत

नवी मुंबई : कोलंबियाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला ३-१ असे नमवले आणि कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

शेवटच्या सामन्यात विजयाची आवश्यकता असताना कोलंबियाकडून युआन व्हिडाल (तिसरे मिनिट), ज्युआन पेनालोझा (६७वे मि.) आणि दिएबर कॅसीडो (८७वे मि.) यांनी गोल केले. अमेरिकेकडून एकमेव गोल जॉर्ज अ‍ॅकॉस्टाने २४व्या मिनिटाला केला.

नवी दिल्ली येथे पहिल्या सामन्यात कोलंबियाने भारताला २-१ असे हरवले होते, त्यानंतर हा दुसरा विजय मिळवला. त्यामुळे अमेरिका, कोलंबिया आणि घाना या तिन्ही संघाच्या खात्यावर ६ गुण जमा असले तरी गोलफरकाच्या आधारे घानाने प्रथम आणि कोलंबियाने दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे अमेरिका तिसऱ्या स्थानावर फेकला गेला.