साखळी फेरीतील चढउतारांच्या प्रवासानंतर कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या अव्वल १६ संघांमधील धुमश्चक्री आजपासून सुरू होत आहे. उपउपांत्यपूर्व फेरीतील या प्रवासात एक चूक महागात पडू शकते, याची जाण या संघांना नक्कीच असेल. सोमवारी कोलंबियाविरुद्ध जर्मनी यांच्या लढतीने बाद फेरीची ही चुरस सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ पॅराग्वे आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे.

जर्मनी-कोलंबिया यांच्यात चुरशीची लढत

नवी दिल्ली : वरिष्ठ स्तरावरील विश्वविजेतेपद नावावर असलेल्या जर्मनीला कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा चषक एकदाही उंचावता आलेला नाही. १९८५मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि हीच त्यांचा सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र यंदा जर्मनीचा संघ जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने भारतात दाखल झाला आहे. कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीची धुमश्चक्री सुरू होईल ती जर्मनी आणि कोलंबिया यांच्यातील लढतीने. या लढतीत कोलंबियाचे पारडे जड मानले जात असले तरी सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू जर्मनीच्या चमूत आहेत. त्यामुळे ही लढत चुरशी होईल, अशी अपेक्षा आहे.

जर्मनी आणि कोलंबिया यांच्या लढतीच्या निमित्ताने युरोप आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील कौशल्यपूर्ण खेळाच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. जर्मनीने चार वेळा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना युरोपियन संघांमध्ये कुमार विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ४४ सामने खेळले आहेत. मात्र कोलंबियाने आपल्या कामगिरीने यंदा सर्वाचे लक्ष वेधले आहे आणि तेही पहिल्यांदा जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी आतुर आहेत. कोलंबिया या स्पर्धेत सहाव्यांदा सहभागी होत असून २००३ आणि २००९मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

साखळी सामन्यात जर्मनीला ०-४ अशा फरकाने इराणकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता आणि या स्पर्धेतील हा आत्तापर्यंतचा धक्कादायक निकाल ठरला आहे. मात्र या पराभवानंतर जर्मनीने दमदार पुनरागमन करत ‘क’ गटात दुसऱ्या स्थानासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जर्मनी आणि कोलंबिया यांना आपापल्या साखळी गटात एका पराभवाचा सामना करावा लागला, तर दोन विजय मिळवता आले आहेत. यापूर्वी हे संघ कोरिया येथे २००७मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले होते आणि त्यावेळी निकाल ३-३ असा बरोबरीत लागला होता.

 

अपराजित पॅराग्वे अमेरिकेच्या आव्हानासाठी सज्ज

नवी दिल्ली : कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखण्यासाठी पॅराग्वेचा संघ उत्सुक असून सोमवारी त्यांच्यासमोर अमेरिकेचे आव्हान आहे. ‘ब’ गटातील तिन्ही लढती जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या पॅराग्वेकडे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा अनुभव कमी असला तरी त्यांनी मागील तिन्ही प्रयत्नांत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाही अमेरिकेचा अडथळा पार करून ही परंपरा कायम राखण्याचा त्यांना मानस आहे.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ही लढत होणार आहे. भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना प्रेक्षकांचा कसा पाठिंबा मिळतो, हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.

अमेरिकेने ‘अ’ गटात यजमान भारताला ३-० असे नमवून दणक्यात सुरुवात केली, परंतु माजी विजेत्या घाना आणि कोलंबियासमोर त्यांना सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले. त्यांनी घानावर १-० असा विजय मिळवला, परंतु अखेरच्या साखळी लढतीत कोलंबियाने त्यांना ३-१ असे नमवले. त्यामुळे पॅराग्वेविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे. पॅराग्वेने साखळी फेरीत दहा गोलचा पाऊस पाडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी मानसिक कणखरतेचे प्रदर्शन घडवत पिछाडीवरून मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. माली आणि टर्की यांच्यावरही त्यांनी विजय मिळवले. मात्र अमेरिकेच्या खेळाडूंच्या कौशल्याची त्यांना पुरेपूर जाण आहे. अखेरच्या साखळी सामन्यात कोलंबियाकडून पराभूत झालेला अमेरिकेचा संघ पुनरागमन करण्यात वाकबगार आहे.

अमेरिकेचे खेळाडू दिल्लीतील वातावरणाशी चांगलेच समरस झाले आहेत. त्यांच्या साखळी लढती येथे झाल्या आहेत आणि त्यामुळे पॅराग्वेला त्यांना नमवणे अवघड आहे. जोश सरजटला रोखण्याचे प्रमुख आव्हान पॅराग्वेला पेलावे लागेल. याशिवाय अमेरिकेकडे अँड्रय़ू कार्लटऩ, अ‍ॅकी अ‍ॅकीनोला आणि टिमोथी वीह हे तुल्यबळ पर्याय आहेत.  वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील पात्रतेच्या आशा मावळल्यानंतर  या कुमार संघाकडून फुटबॉल चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.