नॅथन अ‍ॅकच्या निर्णायक गोलने बोर्नमाऊथचा ४-३ असा विजय

नॅथन अ‍ॅकने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर एएफसी बोर्नमाऊथ क्लबने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉलच्या रविवारी झालेल्या लढतीत बलाढय़ लिव्हरपूलला ४-३ असे नमवले. १-३ अशा पिछाडीवर असलेल्या बोर्नमाऊथने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवताना लिव्हरपूलचा विजय हिरावून घेतला. या पराभवामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी कूच करण्याची लिव्हरपूलची संधी तूर्तास हुकली. तसेच लिव्हरपूलच्या जेतेपदाच्या आशांना जबर धक्का बसला आहे.

सॅडीओ मॅने आणि डिव्हॉक ओरीजी यांनी सुरुवातीच्या २५ मिनिटांत प्रत्येकी एक गोल करून लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ही आघाडी कायम राखताना लिव्हरपूलने विजयाच्या दिशेने कूच केली, परंतु त्यांच्या मार्गात पहिला खडा बोर्नमाऊथच्या कॅलम विल्सनने टाकला. ५५व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या रियान फ्रेजरला लिव्हरपूलच्या मिलनरने घातकरीत्या पाडल्यामुळे बोर्नमाऊथला पंचांनी पेनल्टी स्पॉट किक बहाल केली. त्यावर विल्सनने अचूक गोल करून बोर्नमाऊथची पिछाडी १-२ अशी कमी केली. यजमानांच्या या आनंदावर आठ मिनिटांत पाणी फेरले. इम्रे कॅनने ६४व्या मिनिटाला मॅनेच्या पासवर गोल करून  लिव्हरपूलची आघाडी ३-१ अशी मजबूत केली. त्यानंतर बोर्नमाऊथने संघात आणखी एक बदल करण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅडम लॅल्लानाच्या आगमनाने पाहुण्यांच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली. त्यामुळे ७६ व ७८ मिनिटाला अनुक्रम फ्रेजर आणि स्टीव्ह कुक यांनी झटपट गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. लिव्हरपूलसाठी हा मोठा धक्काच होता. त्यामुळे त्यांनी उर्वरित सामन्यात जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या बाजूने यजमानांनी आक्रमण सुरूच ठेवले. ८०व्या मिनिटाला त्यांच्या बेनिक अ‍ॅफोबचा गोल करण्याचा प्रयत्न लिव्हरपूलचा गोलरक्षक लॉरीस कॅरियसने अडवला. ९०व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या ओरीजीचा प्रयत्न बोर्नमाऊथचा गोलरक्षक  ऑर्थर बोरूसने अडवून सामन्यातील चुरस भरपाई वेळेपर्यंत वाढवली. या वेळी मात्र बोर्नमाऊथच्या कुकने गोलजाळीच्या दिशेने टोलावलेला चेंडू कॅरियसने अडवला, परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्यात त्याला अपयश आले. त्याचक्षणी तेथे उपस्थित असलेल्या नॅथनने ही संधी हेरली आणि बोर्नमाऊथसाठी विजयी गोल केला.

  • २००० प्रीमिअर लीग स्पध्रेत नोव्हेंबर २००० नंतर लिव्हरपूलवर पहिल्यांदाच ३-४ अशा फरकाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली.

 

भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार – अ‍ॅल्टेंबर्ग

लखनौ : लखनौ येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पध्रेत यजमान भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत जर्मनीच्या कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक व्हॅलेंटाईन अ‍ॅल्टेंबर्ग यांनी व्यक्त केले. ‘विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघ प्रबळ दावेदार आहे आणि दोन वर्षांपासून ते कसून सराव करत आहेत. प्रशिक्षक हरेंद्र यांनी खेळाडूंचे मनोबल उंचावण्याची भूमिकाही योग्य रीतीने वठवली आहे,’ असे अ‍ॅल्टेंबर्ग म्हणाले.

‘संघातील सारेच खेळाडू हॉकी इंडिया लीगमध्ये खेळल्यामुळे त्यांना मोठय़ा व्यासपीठाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.