२८ सप्टेंबरपासून आयसीसीने आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये नवीन नियमांची अंमलबजावणी केली. डीआरएस, रन-आऊट, बॅटचा आकार यासारख्या अनेक बाबींमध्ये आयसीसीने नवीन नियम घालून दिले. यात खेळाडूंनी मैदानावरील पंचांशी हुज्जत घातल्यास त्या खेळाडूला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर घालवण्याचा हक्कही पंचांकडे देण्यात आलाय. या नवीन नियमांचा भंग पहिल्यांदाच क्रिकेट सामन्यामध्ये पहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वन-डे स्पर्धेत क्वीन्सलँड संघाचा मार्नस लबसचेंज या खेळाडूने आयसीसीचा नियम मोडला.

ऑस्ट्रेलियात जेएलटी वन-डे करंडक स्पर्धा सुरु आहे. या सामन्यात फलंदाजाने फटका खेळल्यानंतर धाव घेण्यासाठी धावला. हा फटका अडवण्यास क्वीन्सलँड संघाचा लबसचेंज असमर्थ ठरला. पण यावेळी लबसचेंजने आपण चेंडु अडवल्याचा खोटा आव आणत थ्रो करण्याची अॅक्शन केली. यामुळे फलंदाजाने भांबावून मागे फिरण पसंत केलं.

अवश्य वाचा – २८ सप्टेंबरपासून ‘या’ नियमांनुसार खेळवले जाणार क्रिकेटचे सामने

मेलरीबोर्न क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) नियम ४१.५च्या नुसारः ‘कोणत्याची क्षेत्ररक्षकाने चेंडू थ्रो करण्याचा आव आणत किंवा कोणत्याही पद्धतीचे शब्द वापरत धाव घेणाऱ्या फलंदाजाचे लक्ष विचलीत करू नये. तसे वर्तन दंडनीय ठरेल’.

आपल्याकडून चुकीचं वर्तन झाल्याचं लक्षात येताच, लबसचेंजने पंचांकडे जात तात्काळ माफी मागितली. मात्र पंचांनी लबसचेंजच्या संघाला दंड ठोठावत प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल केल्या. या दंड धावांमळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाने ७ बाद २७९ पर्यंत मजल मारली. मात्र मार्नसच्या संघाने हे आव्हान यशस्वी पार केले. खुद्द मार्नसनेच ६२ धावांत ६१ धावा करत विजयात हातभार लावले. ज्यामुळे त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.