श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघासमोर खडतर अशा ऑस्ट्रेलियन दौऱ्याचे आव्हान आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या कर्नाटकच्या लोकेश राहुलला ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवडसमितीची बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्त्व करताना राहुलने दोन्ही डावात शतक झळकावले होते. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्याबरोबरीने राखीव सलामीवीर म्हणून निवडसमिती राहुलच्या नावाचा विचार करण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकलेल्या अनुभवी गौतम गंभीरऐवजी राहुलला संधी मिळू शकते. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या रॉबिन उथप्पालाही पुनरागमनाची संधी मिळू शकते.
कर्णधार आणि यष्टीरक्षक अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून यष्टीरक्षकाच्या जागेसाठी वृद्धिमान साहा आणि नमन ओझा यांच्यात चुरस आहे. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक अशा ऑस्ट्रेलियातील खेळपटय़ांवर निवडसमिती संघात जास्तीतजास्त वेगवान गोलंदाजांना सामील करू शकते. मात्र मोहम्मद शमी आणि वरुण आरोन दुखापतग्रस्त झाल्याने निवडसमितीपुढील चिंता वाढली आहे.