महिला खेळाडूंचा आग्रही सूर

‘‘अन्य कोणत्याही क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही महिलांना सगळ्याच स्तरांवर दुजाभाव सहन करावा लागतो, किंबहुना क्रीडा क्षेत्रावर पुरुषांचे वर्चस्व जास्त असल्याने त्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्त्रियांनी खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले पाहिजे. इथे त्यांना आपले हक्क झगडूनच मिळवावे लागणार आणि जोपर्यंत त्या हिमतीने या सगळ्यावर मात करून आपली खेळातली गुणवत्ता सिद्ध करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या खेळाकडे गंभीरपणे पाहिले जाणार नाही,’’ असा आग्रही सूर ‘महिलांना दुजाभाव’ या चर्चासत्रादरम्यान निघाला.

‘बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमातील पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात क्रीडा क्षेत्रात महिलांना कशा प्रकारे दुजाभाव सहन करावा लागतो, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिला खेळाडूंना त्याच दर्जाच्या सोयीसुविधा मिळतात का, अशा अनेक अंगांनी चर्चा करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कप्तान डायना एडल्जी, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टपटू आणि मानसशास्त्राच्या प्राध्यापिका नीता ताटके आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज, प्रशिक्षक सुमा शिरूर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.

‘‘नेमबाज म्हणून सुरुवातीच्या काळात मुलींचे प्रमाण कसे कमी होते. त्याही वेळी रेंजवर नेमबाजीचा सराव करत असताना महिलांना कपडय़ांपासून वागण्यापर्यंत वेगळे नियम होते. मात्र नेमबाजीच्या क्षेत्रात जेव्हा महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध के ली, त्या वेळी आपोआपच आमच्या खेळासाठी आम्हाला आदर मिळू लागला, आमच्या यशाची दखल घेतली गेली,’’ असे सुमा शिरूर यांनी सांगितले.

क्रिके ट हा महिलांचा खेळ नाही, तुम्ही स्वयंपाकघर सांभाळा, हा सल्ला क्रिकेटमध्ये आदर्श मानल्या गेलेल्या संदीप पाटील आणि दिलीप वेंगसरकरसारख्या महान खेळाडूंकडून एके काळी मिळाला होता, असा अनुभव सांगणाऱ्या डायना एडल्जी यांनी महिला क्रिकेट संघाचा खेळ आजही ‘बीसीसीआय’कडून गंभीरपणे घेतला जात नाही, हे स्पष्टपणे सांगितले, तर महिला खेळाडूंना सोयीसुविधांपासून ते प्रसिद्धीपर्यंत सगळीकडे दुय्यम वागणूक मिळते, या वास्तवावर नीता ताटके यांनी बोट ठेवले. या चर्चासत्राचा समारोप करताना महिला आणि पुरुषांच्या खेळाची तुलना न करता त्यांना त्यांच्या पद्धतीनेच वागणूक मिळायला हवी, असे स्पष्ट प्रतिपादन मान्यवरांनी केले.

महिला खेळाडूंना गांभीर्याने घेतले जात नाही. आयसीसीची विश्वचषक स्पर्धा जिंकल्याशिवाय बीसीसीआयच्या दृष्टीने भारतीय महिला क्रिकेट संघाला महत्त्व मिळणार नाही. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी झगडल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही.
– डायना एडल्जी

क्रीडा क्षेत्रात महिलांचे स्वतंत्र स्थान निर्माण होण्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. महिलांना आजही स्वत:च्या आयुष्यातील निर्णय घेण्याचा अधिकार नसून लग्नानंतर कारकीर्द घडवण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे आवड असूनही त्या फार काळ खेळू शकत नाहीत. महिला खेळाडूंकडे बघण्याच्या याच संकुचित मानसिकतेमुळे पुरुषांच्या लीगप्रमाणे भारतात स्वतंत्र महिलांची लीग सुरू होणे अशक्य आहे.
– सुमा शिरूर

पुरुष खेळाडूंच्या विक्रमाबद्दल, कौशल्याबद्दल त्यांना कायम प्रसिद्धी दिली जाते. त्या तुलनेत महिला खेळाडूंच्या दर्जेदार खेळाबद्दल किंवा त्यांच्या कामगिरीबद्दल कधीच माध्यमांमधून चर्चा होत नाही. महिलांच्या खेळापेक्षा त्यांच्या ग्लॅमरवरच आजही भर दिला जातो. यामुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण होत असून त्यांना पुढील खेळासाठी प्रोत्साहन मिळत नाही.
 – नीता ताटके