आठवडय़ाची मुलाखत : जे. उदय कुमार, उत्तर प्रदेश योद्धाचे मुख्य प्रशिक्षक

उत्तर प्रदेश योद्धा संघाला विजेतेपद मिळवून देण्याबरोबरच या राज्यामध्ये कबड्डीचा तळागाळापर्यंत विकास करण्यासाठीच मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे उत्तर प्रदेश योद्धा संघाचे मुख्य प्रशिक्षक जे. उदय कुमार यांनी सांगितले.

अनुभवी प्रशिक्षक उदय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत, तसेच अनेक उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उत्तर प्रदेशचा संघ प्रथमच प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी झाला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • उत्तर प्रदेशच्या प्रशिक्षकपदाचे दडपण आहे काय?

हा संघ जरी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाला असला तरी संघातील खेळाडूंना कबड्डीचा भरपूर अनुभव आहे. तसेच मी अनेक नवोदित संघांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मला या पदाचे अजिबात दडपण वाटत नाही. हा संघ नवखा असल्यामुळे विजेतेपद मिळवणे आव्हानात्मक आहे. अर्थात अशा गोष्टींची मला सवय झाली आहे. या संघाला विजेतेपद मिळवून देण्यापेक्षाही या राज्यात कबड्डीचा विकास करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. या राज्यामध्ये कबड्डीसाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आह. त्यादृष्टीने मी येथील संघटकांबरोबर चर्चाही केली आहे. या लीगच्या निमित्ताने येथील नैपुण्य शोधून त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत मी योजना आखली आहे.

  • तुमच्या संघात यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू नितीन तोमरचा समावेश आहे. त्याबाबत काय सांगता येईल?

माझ्या दृष्टीने प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूचे मोल अनमोल असते. फ्रँचायझी या खेळाडूंची किंमत ठरवत असतात. अनेक वेळा या स्पर्धामध्ये कमी मूल्य लाभलेला खेळाडूही चमक दाखवून जातो. अर्थात नितीन हा आमच्या संघाचा मोठा आधारस्तंभ आहे. तो खोलवर चढाया करण्याबाबत विशेष ओळखला जातो. तसेच तो संघाचा कर्णधारही आहे. साहजिकच त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत.

  • प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत काय मत आहे?

उत्तर प्रदेशात प्रथमच ही लीग होत असल्यामुळे आम्हालाही त्याबाबत उत्कंठा होती. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आमचा सराव पाहण्यासाठी अनेक लोक येत असत. संघातील अनेक खेळाडूंबरोबर छायाचित्रे घेण्यासाठी त्यांचा उत्साह खूप अतुलनीय होता. प्रत्यक्ष सामन्यांनाही मोठय़ा संख्येने प्रेक्षक येत आहेत. त्यामुळे हा खेळ येथे लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. सुदैवाने येथील शासनानेही कबड्डीच्या विकासाकरिता मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. राज्यात ग्रामीण परिसर मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे तेथे अधिकाधिक हा खेळ कसा पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे.

  • परदेशी खेळाडूंच्या कामगिरीचे भारतापुढे आव्हान निर्माण होऊ शकते काय?

इराण, दक्षिण कोरिया, आदी देशांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू लागले आहेत. त्यांचा दर्जा उंचावला आहे, याबाबत माझे कोणतेही दुमत नाही. मात्र त्यांच्याबरोबरच आमच्या खेळाडूंचाही दर्जा उंचावत चालला आहे. परदेशी खेळाडू शारीरिक तंदुरुस्तीबाबत वरचढ आहेत. परंतु कबड्डीच्या शैलीबाबत त्यांच्या मर्यादा आहेत व हेच भारतीय खेळाडूंच्या यशाचे गमक असते. खेळाडूंना चवडय़ात पकडणे, मैदानाबाहेर ढकलणे आदी शैलीबाबत परदेशी खेळाडूंच्या मर्यादा आहेत. हा खेळ अधिकाधिक देशांमध्ये लोकप्रिय झाला तर आम्हाला ते हवेच आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये कबड्डीच्या प्रवेशाचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.

  • कनिष्ठ गटाच्या सामन्यांचा विकासाकरिता फायदा होईल काय?

होय, निश्चितच. कनिष्ठ गटाच्या लढतींमुळे विविध फ्रँचायझींना भावी काळातील खेळाडूंचा शोध घेण्यास मदत होणार आहे. केवळ या लीगसाठी नव्हे तर भारतीय संघाबरोबरच विविध राज्यांच्या संघांसाठी दुसरी फळी उभारण्यासाठी त्याची मदत होणार आहे. त्याचबरोबर हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अनेक मुलांमध्ये अजूनही क्रिकेटचे वेड खूप आहे. मात्र प्रत्येकाला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवणे शक्य नसते. अशा वेळी कबड्डीसारखा दुसरा चांगला पर्याय होऊ शकतो. उपकनिष्ठ व कुमार गटांमध्येही अशी लीग आयोजित केली पाहिजे, असे माझे मत आहे. तसेच महिलांकरिताही दरवर्षी ही लीग घेतली पाहिजे. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये अनुभव समृद्धता येऊ शकेल.