आठवडय़ाची मुलाखत ; डॉ. निखिल लाटय़े, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ

जिंकण्यासाठी उत्तेजकांसारख्या कृत्रिम गोष्टींचा वापर होऊ नये यासाठी यासंदर्भातील नियमावली, औषधसूची हे सोप्या भाषेत उपलब्ध व्हायला हवे असे मत क्रीडा वैैद्यकतज्ज्ञ डॉ. निखिल लाटय़े यांनी व्यक्त केले. उत्तेजक साक्षरता हाच या प्रश्नावरचा उपाय आहे असेही त्यांनी सांगितले. पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सीरिंज, गोळ्या असे उत्तेजक सेवनाचे प्रकार सापडले होते. शालेय टप्प्यावरील स्पर्धाही उत्तेजकांच्या विळख्यात आहेत हे कटू वास्तव उघड झाले. याप्रकरणाच्या निमित्ताने उत्तेजके, सेवन, दुष्परिणाम, शिक्षण यासंदर्भात त्यांच्याशी केलेली सविस्तर बातचीत.

  • कोणत्या पद्धतीने उत्तेजके घेतली जातात?

उत्तेजक म्हणजे असा पदार्थ किंवा द्रव्य ज्यामुळे नैसर्गिक क्षमतेत कृत्रिम पद्धतीने वाढ होते. खेळभावनेच्या तत्त्वानुसार स्पर्धा खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यादरम्यान होते. उत्तेजकांमुळे खेळाडूला नियमबाह्य़ फायदा मिळतो. यामुळे निकोप स्पर्धा होऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे इंजेक्शन्स आणि गोळ्यांद्वारे उत्तेजके घेतली जातात. याबरोबरीने थेट रक्तामध्ये मिसळून तसेच जास्त दाबाच्या ऑक्सिजनवाटे उत्तेजकांचे सेवन होऊ शकते.

  • पुण्यातील स्पर्धेदरम्यान नाडाचे (राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटना) पथक उपस्थित होते. तरीही असा प्रकार घडला. औषधांच्या दुकानात उत्तेजके उपलब्ध होतात का?

सगळीच इंजेक्शने, वेदनाशामक औषधे प्रतिबंधित नसतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली जातात. दुखापतीतून सावरण्यासाठी विशेष बाब म्हणून खेळाडूंना विशिष्ट उपचारांसाठी प्रतिबंधित उत्तेजकांचा समावेश असलेले औषध घेण्याची सवलत देण्यात येते. प्रतिबंधित उत्तेजकांचा समावेश असलेले सर्वसाधारण औषधांच्या दुकानात उपलब्ध होऊ शकते. मात्र त्याने कामगिरी सुधारेल याची कोणतीही शाश्वती नाही.

  • उत्तेजकांसंदर्भातील नियम, सूची क्लिष्ट भाषेत असते. यामुळे खेळाडूंमध्ये माहितीचा अभाव राहतो का?

निश्चितच. वाडाद्वारे ठरावीक अंतराने प्रतिबंधित उत्तेजकांची यादी जाहीर करण्यात येते. ही यादी म्हणजे रासायनिक द्रव्यांची नावे असतात. खेळाडू याविषयातले तज्ज्ञ नाहीत. त्यांना फारतर औषधाचे नाव माहिती असू शकते. औषधाचे घटक त्यांना माहिती असण्याची शक्यता नाही. उपचारांच्या निमित्ताने नकळतपणे प्रतिबंधित उत्तेजकाचा समावेश असलेले औषध घेतले जाऊ शकते. याचे कारण कुठल्या उत्तेजकावर पर्यायाने औषधावर बंदी आहे आणि कशावर नाही हे समजतच नाही. आपले बरेच खेळाडू सामान्य परिस्थितीतून आलेले असतात. उत्तेजकांसंदर्भातील माहिती प्रामुख्याने इंग्रजीत असते. स्थानिक भाषांमध्ये सोप्या पद्धतीने माहिती दिली तर चुकून उत्तेजकांप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.

  • प्रत्येक खेळाची संघटना, प्रशिक्षक, पालक यांची भूमिका काय?

उत्तेजकांची सखोल माहिती आहे अशा व्यक्तींचीच वानवा आहे. उत्तेजकांचा तपशील, परिणाम याविषयी शाळेत खेळाडू आणि पालकांसाठी कार्यशाळा घेता येऊ शकते. संघटना आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आता आपण प्राथमिक पातळीवर आहोत. शालेय टप्प्यात आकलन पातळी कमी असते. त्यामुळे जिंकायचे असेल तर ते मूळ क्षमतेच्या बळावरच हे मनावर ठसण्यासाठी खेळाडू आणि संलग्न व्यक्तींसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. उत्तेजक साक्षरता वाढणे हाच समस्येवरचा मुख्य उपाय आहे. खेळाडूंनी कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अजाणतेपणी कसलेही सेवन करू नये.

  • उत्तेजकांमुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतात?

नैसर्गिक क्षमतेत वाढ करत असल्याने शारीरिक प्रक्रियेवर परिणाम होणे साहजिक आहे. उत्तेजक सेवनाच्या प्रमाणावर त्रास अवलंबून असतो. सातत्याने सेवन केल्यास हाडांची आणि स्नायूंची वाढ, मूत्रपिंड, यकृत यांच्यावर परिणाम होतो.

  • उत्तेजके घेण्यामागची भूमिका काय असू शकते?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या यशावर मोठी आर्थिक समीकरणे अवलंबून असतात. अव्वल स्थान किंवा पदक न मिळाल्यास हा डोलारा कोसळू शकतो. हे सांभाळण्यासाठी कृत्रिम पद्धतीने आपली क्षमता वाढवून स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय तसेच स्थानिक स्पर्धातील यशावर नोकरी किंवा बढती, विद्यार्थ्यांना वाढीव गुण हे अवलंबून असते. स्पर्धा तीव्र असते,जिंकण्याची खात्री नसते. त्यातून उत्तेजकांचा आधार घेतला जातो. समकालीन किंवा वरिष्ठ खेळाडूंच्या नादाला लागून असे प्रकार होऊ शकतात.

पराग फाटक

parag.phatak@expressindia.com