आठवडय़ाची मुलाखत : रणबीर कपूर, मुंबई सिटी एफसी सहमालक

रुपेरी पडद्यावर विविध भूमिका लीलया साकारणारा रणबीर कपूर म्हणजे अभिनयातील तरबेज खेळाडू. मात्र या रणबीरला मैदानी खेळांतही प्रचंड रस आहे. फुटबॉलचा तो प्रचंड चाहता आहे. रणबीरने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाचे सहमालकत्व स्वीकारले ते या क्रीडाप्रेमातूनच. त्याचा संघ यंदाच्या हंगामात भन्नाट फॉर्ममध्ये असून जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. ‘मी संघाचा मालक नंतर, आधी मी फुटबॉलचा चाहता आहे’, ही रणबीरची भूमिका. ‘केवळ नफा कमावण्यासाठी नाही, तर फुटबॉलचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी हा मालकपणाचा खटाटोप’, असे रणबीर सांगतो. संघाचे नवे मैदान, प्रदर्शनात झालेली सुधारणा, मुंबईकर चाहत्यांचा प्रतिसाद या सगळ्याविषयी रणबीरने लोकसत्ताशी केलेली ही मनमोकळी बातचित..

  • फुटबॉल संघ विकत घेण्यामागची कल्पना काय होती? फुटबॉलचा चाहतावर्ग हळूहळू वाढतो आहे. क्रिकेटवेडय़ा देशात ट्वेन्टी-२०लीगमध्ये संघ विकत घ्यावे असे नाही वाटले?

– फुटबॉल माझे पहिले प्रेम आहे. ज्या शहरात मी लहानाचा मोठा झालो त्या शहराशी संलग्न संघाचा भाग होण्याची संधी मिळाल्यावर नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. भारतीय फुटबॉलचे भविष्य उज्वल आहे. येत्या काही दिवसांत भारतीय फुटबॉलचे दिवस पालटणार आहेत. ही परिस्थिती समजून घेतल्यास मुंबई सिटी एफसीशी जोडला जाणे स्वाभाविक होते.

  • सुरुवातीच्या दोन हंगामात नेरुळ येथील डीवाय पाटील स्टेडियम मुंबई सिटी एफसीचे घरचे मैदान होते. मात्र यंदाच्या हंगामापासून संघाने मुंबई फुटबॉल एरिना मैदानावर खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागची भूमिका काय?

– डीवाय पाटील स्टेडियम हे जागतिक दर्जाचे आहे. तिथे खेळण्याचा आनंद पुरेपूर समाधान देणारा असतो. मात्र हे स्टेडियम मुंबईपासून दूर आहे. शहरातल्या चाहत्यांना या स्टेडियमवर पोहचणे वेळखाऊ होते. चाहत्यांच्या समीप जाणे आवश्यक होते. त्यामुळेच अंधेरी येथील मुंबई फुटबॉल एरिना येथे खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्य असल्याचे चाहत्यांच्या प्रतिसादावरून लक्षात आले. डीवाय पाटील स्टेडियमच्या तुलनेत येथील प्रेक्षकक्षमता कमी आहे. सर्व लढती हाऊसफुल्ल झाल्या. खेळ उंचावण्यासाठी चाहत्यांचा प्रतिसाद निर्णायक असतो. यंदाच्या हंगामात हा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे.

  • सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, ह्रतिक रोशन, अभिषेक बच्चन असे प्रचंड ब्रँडमूल्य असणाऱ्या व्यक्ती आयएसएल स्पर्धेत संघमालक आहेत. ब्रँड रणबीरचा फायदा मुंबई सिटी एफसीला कसा होऊ शकतो?

– फुटबॉलचा चाहता म्हणून मी या संघाचा भाग आहे, सहमालक म्हणून नाही. विविधांगी संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या मुंबई शहराचे हा क्लब प्रतिनिधित्त्व करतो. मी क्लबचा उत्साही चाहता आहे. मुंबई सिटी एफसी ब्रँडला विकसित होण्यासाठी रणबीर किंवा अन्य कोणत्याही ब्रँडची आवश्यकता नाही. प्रत्येक हंगामागणिक हे सिद्ध होते आहे.

  • सुरुवातीच्या दोन हंगामात मुंबई सिटी एफसी संघाला उपांत्य फेरीत स्थान पटकावता आले नाही. मात्र यंदा संघाने दमदार प्रदर्शनासह उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. सकारात्मक बदलाचे मानकरी कोण?

– सुरुवातीच्या दोन हंगामात आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही. मात्र झालेल्या चुकांतून आम्ही खूप गोष्टी शिकलो. कर्णधार दिएगो फोरलॉन, सुनील छेत्रीसारखा प्रमुख खेळाडू, प्रशिक्षक, सहयोगी, तांत्रिक चमू या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच यंदाच्या हंगामात आम्ही विजयपथावर आहोत. एकावेळी एका सामन्याचा विचार करण्यावर भर देताना विजयाने हुरळून न जाण्याचे कसब खेळाडूंनी आत्मसात केले आहे. अशीच वाटचाल करत जेतेपद पटकवायचे आहे.

  • भारतीय फुटबॉलचा चेहरा असलेला सुनील छेत्री तुमच्या ताफ्यात असण्याने फरक पडला का?

– सुनीलकडे उपजतच नेतृत्त्वगुण आहेत. गेले दोन वर्ष त्याला भन्नाट सूर गवसला आहे. तो अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याबरोबरच एक सच्चा माणूस आहे. खेळाप्रती २०० टक्के योगदान देण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्याची त्याची वृत्ती विलक्षण आहे. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे आमच्यासाठी भाग्यशाली आहे.

  • दर्जेदार कामगिरी करणारा प्रत्येक क्लब प्रतिभाशाली युवा खेळाडूंसाठी उपक्रमाची आखणी करतो. मुंबई सिटी एफसीचे याबाबतीत प्रयत्न काय?

– लहान वयातच कौशल्याला पैलू पाडू शकतील अशा उपक्रमांवर सुरुवातीपासून आम्ही भर दिला आहे. वर्षभर हा उपक्रम सुरू असतो. सर्वोत्तम पायाभूत सुविधांसाठीचा पुरस्कार सुरुवातीच्या दोन हंगामात आम्हाला मिळाला होता. उपक्रमाचे रुपांतर कायमस्वरुपी अकादमीत करण्याचा मानस आहे. जेणेकरून आमचा कनिष्ठ स्तरावरील संघही तयार असेल. मुंबईसारख्या मोठय़ा शहरात जागेची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे योजलेले सगळे उपक्रम कार्यान्वित करताना अडचणी येतात. मात्र आमच्या प्रयत्नांना मिळणारा भरभरून प्रतिसाद शहरातील फुटबॉल प्रतिभेची स्पष्ट जाणीव करून देणारा आहे.

  • तुझ्या उद्यमशीलतेला बॉलीवूडचा प्रतिसाद कसा आहे?

– मी स्वत:ला अजूनही उद्योजक किंवा संघमालक मानत नाही. अजून तो टप्पा गाठण्यासाठी मला वेळ आहे. मुंबई सिटी एफसीचा भाग असणे आनंददायी आहे. त्यामुळे संघासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा देतो. मुंबई सिटी एफसी नफा कमाईचे व्यासपीठ नसून खेळाचे वेड जपण्याचे माध्यम आहे.