दुखापतीवर मात करणाऱ्या तिसऱ्या मानांकित सेरेना विल्यम्सने धडाकेबाज खेळ करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत तिसऱ्या फेरीत थाटात प्रवेश केला. गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्का आणि ब्रिटनच्या अँडी मरे यांनी सुरेख खेळ करत तिसऱ्या फेरीत मजल मारली आहे.
१५ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या सेरेनाने स्पेनच्या गॅब्रिन मुगुरुझा हिचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवत सहाव्या ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. सेरेनाला तिसऱ्या फेरीत जपानच्या आयूमी बोरिटा हिच्याशी लढत द्यावी लागेल. हा सामना सेरेनाने जिंकल्यास तिची उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिच्याशी गाठ पडेल. अव्वल मानांकित बेलारूसच्या अझारेन्काने ग्रीसच्या एलेनी डॅनिलीडोऊ हिचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. डेन्मार्कच्या दहाव्या मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकी हिने क्रोएशियाच्या डॉना व्हेकीचला ६-१, ६-४ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हा हिने तैपेईच्या सू-वेई साय हिच्यावर ६-२, ६-१ अशी सहज मात केली.
पुरुषांमध्ये, अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या अँडी मरे याने पोर्तुगालच्या जोआओ सौसा याचा ६-२, ६-२, ६-४ असा पाडाव करत ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली. गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगा याने जपानच्या गो सोएडावर ६-३, ७-६ (७/१), ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात करत पुढील फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने जर्मनीच्या बेंजामिन बेकरवर ६-२, ६-४, ६-२ असा विजय प्राप्त केला. अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या रायन हॅरिसनचा ६-१, ६-२, ६-३ असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.
पुरुष दुहेरीतून पेस पराभूत
मेलबर्न : भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस आणि त्याचा चेक प्रजासत्ताकचा सहकारी राडेक स्टेपानेक यांना पुरुष दुहेरीच्या सलामीच्या सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे. दुसऱ्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीवर दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसन आणि इस्रायलचा जोनाथन एल्रिच यांनी ८९ मिनिटांत ३-६, ५-७ अशी मात केली. अँडरसन-एल्रिच जोडीने केवळ सव्‍‌र्हिसवरच भर दिला नाही तर सातपैकी चार ब्रेकपॉइंट आपल्या बाजूने वळविण्यातही त्यांना यश आले. पेस-स्टेपानेक जोडीला प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस परतवून लावण्यात अपयश आले. पहिला सेट सहजपणे गमावल्यानंतर पेस-स्टेपानेक यांनी दुसऱ्या सेटमध्ये सुरेख खेळ केला. पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यांना सेटसह सामन्यावर पाणी सोडावे लागले. मिश्र दुहेरीत पेस आणि त्याची रशियाची साथीदार एलेना वेस्निना यांचा सलामीचा सामना पाकिस्तानचा ऐसाम उल-हक कुरेशी आणि स्वीडनची सोफिया आर्विडसन यांच्याशी होणार आहे.