इंग्लिश प्रीमिअर लीगचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना लिव्हरपूलने रविवारी नॉर्विच सिटीवर ३-२ असा विजय मिळवला. शनिवारी चेल्सीला पराभूत व्हावे लागले होते, त्यामुळे या विजयासह लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतपद जवळपास निश्चित केले आहे. आता फक्त तीन सामने शिल्लक असून लिव्हरपूल चेल्सीपेक्षा पाच गुणांनी आघाडीवर आहे.
नॉर्विच सिटीविरुद्धच्या विजयात रहीम स्टर्लिग आणि लुइस सुआरेझ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या मोसमातील ३०वा गोल झळकावत सुआरेझने विक्रमी कामगिरीची नोंद केली. १९८७ साली इयान रश यांनी साकारलेल्या कामगिरीनंतर लिव्हरपूलसाठी ३० गोल लगावणारा सुआरेझ हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. स्टर्लिगकडून डाव्या बाजूने मिळालेल्या पासवर गोल करत सुआरेझने ११व्या मिनिटाला ही किमया साधली. नॉर्विच सिटीविरुद्धच्या गेल्या पाच सामन्यांमधील त्याचा हा १२वा गोल ठरला. प्रीमिअर लीग हंगामातील सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमापासून सुआरेझ एक गोल दूर आहे. अ‍ॅलन शीअरर आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या नावावर हा विक्रम आहे.
चौथ्या मिनिटाला रहीम स्टर्लिगने लिव्हरपूलचे खाते खोलले. ११व्या मिनिटाला सुआरेझने लिव्हरपूलची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात नॉर्विच सिटीने त्यांना तोडीस तोड उत्तर दिले. ५४व्या मिनिटाला नॉर्विच सिटीच्या गॅरी हूपरने गोल करत सामन्यात रंगत आणली. मात्र स्टर्लिगने ६२व्या मिनिटाला दुसरा गोल करत लिव्हरपूलची आघाडी ३-१ अशी वाढवली. रॉबर्ट स्नोडग्रॉसने नॉर्विचसाठी दुसरा गोल केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.