प्रशिक्षक खेळाडूंना कुठे चूक होत आहे, त्यावर उपाय काय हे सांगू शकतो, पण तो मैदानावर येऊ शकत नाही. मैदानावर खेळाडूलाच कामगिरी करायची असते. भारतीय खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केल्यास संघाच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची पाठराखण करताना पत्रकार परिषदेत धोनीने सांगितले.
आम्ही मालिका पराभूत झालो आहेत, त्यामुळे या सामन्यात आगामी मालिकेचा आम्हाला सराव करता येईल. संघाची फलंदाजी चांगली होत नाही, एक संघ म्हणून या मालिकेत आम्ही खेळलेलो नाही. त्यामुळे संघातील फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारायला हवी आणि त्यानुसार कामगिरी करायला हवी. प्रत्येक वेळी संघ बदलणे हा उपाय नसतो. दोष देणे सोपे असते, पण त्यावर उपाय काढणे नक्कीच कठीण असते, असे धोनीने सांगितले.
धोनी सामन्याला मुकण्याची शक्यता
‘सध्या संघात जर कोणी तंदुरुस्त नसेल, तर तो मी आहे,’ असे म्हणत धोनीने सामन्याच्या पूर्वसंध्येला सर्वानाच घाबरवले आहे. सध्या धोनी हा एकमेव फलंदाज चांगल्या फॉर्मात आहे आणि तो जर तिसऱ्या सामन्यात खेळणार नसेल तर संघाची काय अवस्था होईल, याची साऱ्यांनाच भीती वाटत आहे. शनिवारी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना धोनीच्या पाठीला दुखापत झाली. त्याची ही दुखापत कोणत्या स्वरूपाची आहे, हे नेमके समजू शकलेले नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून धोनी खेळला नाही, तर दिनेश कार्तिकला पाचारण करण्यात आले आहे.