भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आता प्राप्तिकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यवसायात असणा-या आम्रपाली उद्योगसमुहाकडून महेंद्रसिंग धोनीला देण्यात आलेल्या ७५कोटी रूपयांच्या रकमेच्या धनादेशांवर आकारण्यात आलेल्या करव्यवहरांची चौकशी रांची येथील प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येणार आहे. आम्रपाली उद्योगसमुहाचे अध्यक्ष अनिल शर्मा यांच्याकडून महेंद्रसिंग धोनीला ७५ कोटी रुपयांच्या रकमेचे आगाऊ तारखांचे धनादेश देण्यात आले होते. आम्रपाली उद्योगसमुहाकडून २०१२साली धोनीला देण्यात आलेले हे धनादेश तब्बल दोन वर्षांनी म्हणजे २०१४मध्ये वठविण्यात आले. महेंद्रसिंग धोनची आम्रपाली उद्योगसमुहात भागीदारी असून धोनी या उद्योगसमुहाचा सदिच्छा दूत आहे. तसेच आम्रपाली-माही डेव्हलपर्स या कंपनीत २५टक्के समभाग धोनीची पत्नी साक्षी सिंग हिच्या नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यापूर्वी आयकर विभागाकडून आम्रपाली उद्योगसमुहाच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील मागवण्यात आले होते. तसेच २०१३च्या ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील कार्यालयांवर छापेसुद्धा टाकण्यात आले होते. अशाप्रकारे कोणतीही चौकशी झाल्याचा कंपनीच्या अधिका-यांकडून इन्कार करण्यात आला असला तरी याप्रकरणी महेद्रसिंग धोनीची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.