मॅग्नस कार्लसनची जेतेपदाची हॅट्ट्रिक; टायब्रेकरमध्ये रशियाच्या सर्जी कर्जाकिनवर मात

नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळ विश्वातील आपले वर्चस्व अबाधित राखताना विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेत सलग तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. रशियाचा आव्हानवीर सर्जी कर्जाकिनविरुद्धच्या १२ डावांत ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये कार्लसनने ९-७ असा विजय मिळवला. निर्धारित १२ डावांमध्ये कर्जाकिनने गतविजेत्या कार्लसनला चांगलेच झुंजवले, परंतु चिवट व घोटीव खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कार्लसनने टायब्रेकरमध्ये आपला करिश्मा दाखवला. वाढदिवसालाच कार्लसनने हे जेतेपद पटकावून त्याचा आनंद द्विगुणित केला.

टायब्रेकरमधील पहिल्या दोन डावांत निकाल बरोबरीत लागला. मात्र, तिसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी सुरुवात करणाऱ्या कर्जाकिनला विजय मिळवण्याची संधी होती, परंतु बुद्धिबळातील या सम्राटाने अप्रतिम खेळ करताना ३८व्या चालीत कर्जाकिनला हार मानण्यास भाग पाडले. चौथ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांचा पुरेपूर फायदा घेताना ५०व्या चालीत विजय मिळवून ३-१ अशा फरकाने जेतेपदावर मोहोर उमटवली.

सहा तासांच्या या टायब्रेकर फेरीत चार डावांमध्ये प्रत्येक खेळाडूला २५ मिनिटांत आपला खेळ पूर्ण करायचा होता. त्यामुळे दोघांकडूनही काही चुका झाल्या आणि त्यामुळे जेतेपदाचा अंदाज बांधणे खडतर होऊन बसले. तरीही ब्लिट्झ प्रकारात हातखंडा असलेला आणि २०१० पासून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला कार्लसनच जेतेपदाचा दावेदार होता.

२६ वर्षीय कार्लसनने यंदाच्या वर्षी अनेक ब्लिट्झ स्पर्धामध्ये सहभाग घेतला आणि अमेरिकेच्या ग्रॅण्डमास्टर हिकारू नाकामुराला नमवण्याचा पराक्रमही केला होता, परंतु कर्जाकिनविरुद्ध त्याच्या मानसिक कणखरतेचा कस लागत होता. आठव्या डावातील पराभवानंतर कार्लसनने पत्रकार परिषदेत दरवाजा जोरात आदळला. त्यामुळे त्याच्यावर मानधनातील पाच टक्के रक्कमेचा दंडही ठोठावण्यात आला.  कार्लसनने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित या स्पध्रेत २०१३ आणि २०१४ साली भारताच्या विश्वनाथन आनंदला नमवून जेतेपद पटकावले होते. वयाच्या १२ वर्षी ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकावणाऱ्या कर्जाकिनने त्याचा अभ्यास करून खेळ केला होता. कुणालाही त्याच्याकडून अशा अप्रतिम खेळाची अपेक्षा नव्हती. ‘सर्जीने आपल्या खेळाने सर्वाना प्रभावित केले. अव्वल दर्जाच्या खेळाडूलाही पराभूत करण्याची क्षमता त्यामध्ये आहे,’ असे मत फिलिपाइन्सचा ग्रॅण्डमास्टर वेस्ली सो याने व्यक्त केले.