पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेतील दहाव्या डावात आशादायी विजय मिळवण्याऐवजी पुन्हा बरोबरीत समाधान मानले. आतापर्यंतच्या दहा डावांपैकी सातवा k04डाव बरोबरीत सुटला, असून नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडे एका गुणाची आघाडी आहे. त्यामुळे कार्लसनने पुन्हा जगज्जेतेपद जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.
आता गुणसंख्या ५.५-४.५ अशा फरकाने कार्लसनसाठी अनुकूल आहे. १२ डावांच्या या लढतीमधील रविवारी होणाऱ्या शेवटून दुसऱ्या डावात कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणार आहे.
दहाव्या डावात आनंद पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळला, परंतु त्याचा अपेक्षित फायदा तो उठवू शकला नाही. कालर्सनने प्रारंभीच आश्चर्याचा धक्का देत ग्रुनफेल्ड बचाव पद्धतीने प्रारंभ केला. आनंदने मात्र रॅडोस्लाव्ह वोज्ताझेक पद्धतीवर भर दिला. त्यामुळे हा डाव चुरशी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ३२ चालीत दोघांनी बरोबरी मान्य केली.
डाव जसजसा पुढे सरकत होता तसतसा कार्लसन नव्या चाली आनंदपेक्षा वेगाने खेळत होता. घडय़ाळाचा अंदाज बांधून कार्लसनने जरी आत्मविश्वासाने चाली रचल्या तरी या सामन्यात आनंद अधिक चांगला खेळला, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
‘‘आनंदला जेव्हा चांगली संधी चालून आली होती, तेव्हा त्याने त्याचा फायदा घेण्याऐवजी कार्लसनला बरोबरीची संधी दिली,’’ असे माजी महिला विश्वविजेत्या सुसान पोल्गरने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.
आता दोन डाव बाकी असून, पुढील डाव त्याने बरोबरीत सोडवल्यास लढतीचा निकाल अंतिम डावात लागू शकेल. आनंद पुढील डावात काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणार आहे. परंतु जेतेपद आनंदकडून निसटून चालले असल्याचा प्रत्यय सध्या बुद्धिबळ विश्वात येत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आनंद म्हणाला, ‘‘आम्हाला गुणसंख्या आणि परिस्थिती याची पूर्ण कल्पना आहे. मला खेळायचे आहे, याचीही जाणीव आहे. माझे आव्हान अद्याप शाबूत आहे.’’
निकाल : बरोबरी
गुण      ४.५   ५.५