ओलसर हवामानामुळे द्रुतगती गोलंदाजीस अनुकूल झालेल्या वातावरणात महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ १०५ धावांत कोसळला. त्यामुळे हरयाणास रणजी करंडक क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३१ धावांची आघाडी मिळाली.
या सामन्यात रविवारी केवळ १७.५ षटकांचा खेळ झाला होता. त्यामध्ये हरयाणाने २ बाद ४१ धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात १३६ धावांपर्यंत मजल गाठली. महाराष्ट्राकडून समाद फल्लाह याने ३६ धावांत ५ बळी घेतले तर अनुपम संकलेचा याने ३१ धावांत तीन गडी बाद केले. पहिल्या डावात आघाडी मिळविण्यासाठी १३७ धावांचे आव्हान महाराष्ट्रास कठीण नव्हते मात्र आशिष हुडा (५/२७) व जोगिंदर शर्मा (३/२७) यांच्या भेदक माऱ्यापुढे महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.