हर्षद खडिवाले आणि अंकित बावणे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर महाराष्ट्राने ओदिशाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ५ बाद २३१ अशी मजल मारली आहे.

ओदिशाचा मध्यमगती गोलंदाज बिपलाब समंतरायने सुरुवातीपासूनच भेदक मारा करीत महाराष्ट्राच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम केले. महाराष्ट्राला तीन धावा झाल्या असताना त्यांना पहिला धक्का बसला. त्यानंतर ठरावीक फरकाने त्यांचे फलंदाज बाद झाल्याने त्यांची ३ बाद ६२ अशी स्थिती होती. पण खडिवाले आणि बावणे यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचत संघाचा वाडव सावरला. खडिवालेने १० चौकारांच्या जोरावर ७४ धावांची खेळी साकारली, तर बावणेने ७ चौकारांच्या जोरावर ६० धावा केल्या. या दोघांकडूनही अर्धशतक झळकावल्यावर मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. पण या दोघांनाही शतकाची वेस ओलांडता आली नाही.

ओदिशाच्या बिपलाबने अचूक मारा करीत १० षटकांमध्ये ३१ धावा देत महाराष्ट्राच्या तीन फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ८६ षटकांत ५ बाद २३१ (हर्षद खडिवाले ७४, अंकित बावणे ६०; बिपलाब समंतराय ३/३१) वि. ओदिशा.