महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये पुरुष व महिला या दोन्ही विभागांत कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. ट्रायथलॉनमधील मिश्र विभागातही महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले.
महाराष्ट्राला बॅडमिंटनमधील दोन्ही विभागांत उपान्त्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांना कांस्यपदक देण्यात आले. महिलांच्या अंतिम सामन्यात तेलंगणा संघाने केरळचा २-० असा पराभव करीत सोनेरी कामगिरी केली. कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्र संघात प्राजक्ता सावंत, सायली गोखले, नेहा पंडित, संयोगिता घोरपडे यांचा समावेश होता. पुरुषांच्या विभागात कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्र संघात अक्षय राऊत, अक्षय देवलकर, श्लोक रामचंद्रन, शुभंकर डे व सारंग लखानी यांचा समावेश होता. अंतिम सामन्यात केरळने हरयाणा संघाचा ३-२ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.
ट्रायथलॉनमध्ये कांस्य
ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राने मिश्र विभागात कांस्यपदक मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली. या संघात अक्षय कदम, रघुनाथ माळी, तेजश्री नाईक व स्वप्नाली यादव यांचा समावेश होता. मणिपूर संघाने सुवर्णपदक मिळविले तर गुजरातला रौप्यपदक पटकाविले.
बास्केटबॉलमध्ये महिलांची आगेकूच
महाराष्ट्राच्या महिला संघाने बास्केटबॉल स्पर्धेत आगेकूच राखली. त्यांनी पंजाबचा ८०-५८ असा सहज पराभव केला, पूर्वार्धात त्यांच्याकडे ३९-२६ अशी आघाडी होती.
हॉकीत ओडिशा अंतिम फेरीत
ओडिशा संघाने हरयाणाचा ८-७ असा पराभव करीत हॉकीतील पुरुष विभागात अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांना सेनादलाचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. उपान्त्य फेरीत सेनादलाने झारखंडचे आव्हान ५-१ असे लीलया संपुष्टात आणले. महिलांच्या अंतिम लढतीत हरयाणा संघाची पंजाबशी गाठ पडणार आहे. उपान्त्य लढतीत हरयाणाने झारखंडला ३-२ असे हरविले. अन्य लढतीत पंजाबने ओडिशाचे आव्हान ३-० असे परतविले.
कबड्डीत हरयाणाची आगेकूच
कबड्डीतील पुरुषांच्या गटात हरयाणा संघाने अपराजित्व राखले. त्यांनी कर्नाटक संघावर ३६-३२ असा निसटता विजय नोंदविला. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने आंध्र प्रदेशचा २८-१८ असा पराभव केला.