पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्राने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नेमबाजीमध्ये महाराष्ट्राने ११ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई करीत एकूण ५३ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावले. याचप्रमाणे बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदक पटकावले.
नेमबाजीमध्ये १७ वर्षांखालील पीप साइट एअर रायफल प्रकारात गायत्री पावसकरने सुवर्णपद पटकावले. १७ वर्षांखालील एअर पिस्तूल प्रकारात हर्षदा निथवेने सुवर्ण आणि मनीषा राठोडने कांस्यपदक मिळवले. १७ वर्षांखालील मुलांच्या एअर रायफल प्रकारात सुमीत यादवने सुवर्ण आणि श्रीवल्लभ सावंतने रौप्यपदकाला गवसणी घातली. १७ वर्षांखालील एअर रायफल प्रकारात प्रिया ढमढेरेने सुवर्ण तर आकांक्षा शिंदेने रौप्यपदकाची कमाई केली. १९ वर्षांखालील मुलांच्या पीप साइट एअर रायफल प्रकारात प्रतीक बोरसेने सुवर्ण, याच विभागातील मुलींच्या गटात गार्गी शिरसाठनेही सुवर्णपदकाची लूट केली. १९ वर्षांखालील मुलांच्या एअर पिस्तूल प्रकारात संभाजी पाटीलला रौप्य पटक पटकावता आले.
१९ वर्षांखालील मुलींच्या एअर पिस्तूल गटात महाराष्ट्राने कमाल करीत तिन्ही पटकांची लूट केली. विद्धी विरमानीने सुवर्ण, दक्षता लिंगायतने रौप्य आणि रोशन फर्नाडिसने कांस्यपदक मिळवले. १९ वर्षांखालील साइट एअर राफल प्रकारात ओंकार घोडकेने सुवर्ण आणि शिवम सावंतने कांस्यपदक पटकावले. याच विभागातील मुलींच्या गटात गौतमी पंडितने सुवर्ण आणि वैष्णवी गायकवाडने रौप्यपदकाची कमाई केली.
बॅडमिंटनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा २-० असा धुव्वा उडवला. यामध्ये वैदेही चौधरीने दिल्लीच्या भाव्या ऋषीला २२-२०, २१-१२ असे पराभूत केले, तर दुहेरीमध्ये वैदेही आणि आदिती काळे यांनी भाव्या आणि नूर चाटवाल जोडीवर २१-७, २१-१८ असा सहज विजय मिळवला. तलवारबाजीमध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या सेबर गटामध्ये महाराष्ट्राने पंजाबचा १५-९ असा पराभव केला. महाराष्ट्राकडून श्लोका शिंदे, विज्ञानी उमाटे, उन्नती आयलवार, सिद्धी जरीवाल यांनी दमदार कामगिरी केली. हँडबॉलमध्ये महाराष्ट्राला १४ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटात दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला.