खडीवालेचे शतक, मोटवानीच्या ९१ धावा
सलामीवीर हर्षद खडीवालेचे शतक तसेच कर्णधार रोहित मोटवानी याच्या शैलीदार ९१ धावा यामुळेच महाराष्ट्रास बडोद्याविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात सोमवारी पहिल्या डावात १४ धावांची आघाडी मिळविता आली.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी बडोद्याच्या पहिल्या डावातील ३६२ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने पहिल्या डावात ७ बाद ३७६ धावा केल्या. खडीवाले व मोटवानी यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली शतकी भागीदारी हेच महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. खडीवाले याने जबाबदारीने खेळ करीत १६८ धावा टोलविल्या. त्याने अंकित बावणे (२८) याच्या साथीत ६४ धावा, तर मोटवानीच्या साथीत १६६ धावा जमविल्या.
खडीवाले व बावणे यांनी ३ बाद १३१ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र त्यांनी बावणे याची विकेट लगेचच गमावली. गगनजितसिंग याने बावणे याला बाद केले. बावणे याने दमदार २८ धावा करीत खडीवाले याला चांगली साथ दिली. तो बाद झाल्यानंतर आलेल्या मोटवानी याने कर्णधारपदास साजेसा खेळ करीत खडीवाले याच्या साथीत संघाच्या धावसंख्येस आकार दिला. खडीवाले याने आपले शतक २४७ मिनिटांमध्ये पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने अधिकच सुरेख फटकेबाजी केली. त्याने मोटवानीच्या साथीत १६६ धावांची भर घातली. भार्गव भट्ट याने स्वत:च्या गोलंदाजीवर खडीवाले याचा झेल घेत ही जोडी फोडली. खडीवाले याने आत्मविश्वासाने खेळ करीत १६८ धावा केल्या. ४२३ मिनिटांच्या खेळांत त्याने वीस चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली.
खडीवाले याच्या जागी आलेल्या राहुल त्रिपाठी याच्या साथीत मोटवानी याने ४६ धावांची भर घातली. त्रिपाठीने २४ धावा केल्या. मोटवानी हा शतक पूर्ण करण्याबाबत दुर्दैवी ठरला. भार्गव याने त्याचा शतकापूर्वीच त्रिफळा उडविला. मोटवानी याने ३२८ मिनिटांच्या खेळांत ११ चौकारांसह ९१ धावा केल्या. दिवसअखेर महाराष्ट्राला पहिल्या डावात १४ धावांचे अधिक्य मिळाले. त्या वेळी श्रीकांत मुंढे व अक्षय दरेकर हे अनुक्रमे १८ व १ धावांवर खेळत होते. महाराष्ट्राचे आणखी तीन गडी बाद व्हायचे आहेत. बडोद्याकडून भार्गव भट्ट याने सर्वाधिक तीन बळी घेतले. सामन्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असल्यामुळे सामना अनिर्णीत राहण्याचीच शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक
बडोदा पहिला डाव ३६२
महाराष्ट्र पहिला डाव ७ बाद ३७६ (हर्षद खडीवाले १६८, अंकित बावणे २८, रोहित मोटवानी ९१, राहुल त्रिपाठी २४, भार्गव भट्ट ३/११६, गगनजिंतसिंग २/९५)