पुण्याचा अभिजित कटके आणि जळगावचा विजय चौधरी यांच्यात ६०वी महाराष्ट्र केसरी कुस्तीची किताबी लढत होणार आहे. गादी विभागात अभिजितने लातूरच्या सागर बिराजदारची विजयी घोडदौड रोखली. अभिजितने ही लढत २-१ अशी जिंकली. त्याने प्रथमच महाराष्ट्र केसरी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. माती विभागात विजयने विलास डोईफोडेचे आव्हान ८-० असे सहज परतवून लावले. विजयने सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी तो उत्सुक आहे. महाराष्ट्र केसरीची किताबी लढत शनिवारी होणार आहे.

गादी विभागातील पहिल्या उपांत्य लढतीत सागर बिराजदार (लातूर) आणि मुंबईचा गणेश जगताप ही गादीवरील पहिली उपांत्य लढत लक्षवेधी ठरली.   गणेशने पहिल्या फेरीत त्याच्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत सागरने आपल्या संयमाला आक्रमकेती जोड दिली आणि गणेशवर ताबा मिळवत तीन गुण वसूल केले. त्यामुळे निर्णायक फेरीच्या अखेरच्या टप्प्यात लढत ६-६ अशी बरोबरीत आली होती. त्याच वेळी सागरने आपला भारंदाज डाव टाकून झटपट ६ गुणांची कमाई करून लढतीचा निकाल स्पष्ट केला. दुसरी  लढत अभिजित कटके आणि मुंबईचा समाधान पाटील यांच्यात झाली. पहिल्या फेरीत समाधान १-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीला समाधानचा पकड मिळवण्याचा प्रयत्न फसला आणि ती संधी साधत अभिजितने पट काढून झटपट ३ गुणांची कमाई केली. नियोजित लढत ३-२ अशी बरोबरीत सुटली होती. मात्र, पिछाडी भरून काढल्यामुळे नियमानुसार अभिजितला विजयी घोषित केले.

माती विभागातील उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडेने लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडेचे आव्हान अगदी अखेरच्या क्षणी कुस्ती चीतपट करत परतावून लावले. आघाडी असताना निष्कारण घाई करण्याचा फटका ज्ञानेश्वरला बसला आणि त्याचाच डाव त्याच्यावर उलटला. विलासने संधी साधत त्याला चितपट केले. मातीवरील दुसऱ्या उपांत्य लढतीत डबल महाराष्ट्र केसरी विजय जाधव सहज विजयी झाला. त्याला प्रतिस्पर्धी मारुती जाधव फारसे आव्हान देऊ शकला नाही.