२८ व्या राष्ट्रीय उपकनिष्ठ स्पर्धेस महाराष्ट्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सरचिटणीस सुरेश शर्मा यांनी येथे नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये सुंदर स्पर्धा होत असताना संघटनेचे पदाधिकारी का उपस्थित राहिले नाहीत, याची निश्चितच चौकशी करण्यात येईल, असे शर्मा यांनी सांगितले.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचा रविवारी समारोप होणार आहे. या पाश्र्वभूमीवर शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस व खो-खो महासंघाचे अध्यक्ष मेहता यांनी स्पर्धेची पाहणी करून आयोजनाची स्तुती केली. उन्हाचा खेळाडूंना त्रास होऊ नये यासाठी तंबूमध्ये स्पर्धा घेण्यासह मुलींना सूर मारताना दुखापत होऊ नये याकरिता विशेष कापडी सुरक्षा कवच तयार करणे अशा संकल्पना राबविणाऱ्या तसेच खो-खोच्या प्रसारासाठी कोणत्याही संघटनेला सर्वेतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मेहता यांनी दिली. नाशिकच्या आयोजनाबद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून चांगली माहिती मिळाल्यामुळे खास भेट देण्यासाठी आल्याचे नमूद केले. महासंघाचे पदाधिकारी येत असताना राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येणे का टाळले, या प्रश्नावर काही वेळा जिल्हा आणि राज्य संघटना यांच्यात काही बाबतीत मतभेद असू शकतात. त्याचा तपास केला जाईल, अशी ग्वाही दिली. महासंघाचे सरचिटणीस शर्मा यांनीही राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमागे कोणती कारणे आहेत, त्यांची अशी कोणती हतबलता होती हे हमखास त्यांना विचारले जाईल, असे सांगितले.

खो-खो अधिकाधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी महासंघाकडून प्रयत्न करण्यात येत असून आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश हे पहिले ध्येय ठरविण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारच्या सहकार्याने होणाऱ्या हिमालयीन क्रीडा महोत्सवात खो-खोचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर कमकुवत असणाऱ्या राज्यांमध्ये खो-खो परिपक्व होण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याची योजना असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट  केले.

खो-खो प्रीमियर लिगचा प्रस्तावच नाही

प्रो कबड्डीच्या धर्तीवर खो-खोच्या प्रसारासाठी प्रीमियर लिगचे आयोजन करण्याची चर्चा होत असल्याबद्दल विचारल्यावर अद्याप असा प्रस्ताव कोणाकडूनही महासंघाकडे आला नसल्याचे अध्यक्ष राजीव मेहता आणि सरचिटणीस सुरेश शर्मा यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव आल्यावरच त्याविषयी विचार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत

नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी येथील छत्रपती  शिवाजी स्टेडियमवर आयोजित २८ व्या उपकनिष्ठ खो-खो स्पर्धेत उपउपांत्य फेरी गाठली. मुलींनी दिल्लीवर १६-३ असा, तर मुलांनी कर्नाटकवर १४-११ अशी मात केली.

दिल्लीविरुद्ध महाराष्ट्राकडून रितीका मगदुनने २.२० मिनिटे संरक्षण व दोन गडी बाद अशी कामगिरी केली. गौरी शेंडेने आक्रमणात तीन गडी टिपले. महाराष्ट्राच्या मुलांनीही बलाढय़ कर्नाटकचे आव्हान संपुष्ठात आणले. महाराष्ट्राकडून नाशिकच्या चंदू चावरेने ३.३० मिनिटे संरक्षण तसेच १० गडी बाद अशी कामगिरी केली. सचिन आहेर, शुभम थोरात, मोहन चौधरी यांची त्याला चांगली साथ मिळाली. मुलांच्या इतर सामन्यांमध्ये आंध्र प्रदेशने विदर्भाचा १०-४, कोल्हापूरने पुदुचेरीचा १४-१०, तेलगनाने पश्चिम बंगालचा १२-७ असा पराभव केला. मुलींमध्ये कनार्टकने उत्तर प्रदेशवर १२-३, ओरिसाने विदर्भावर १३-६ अशी मात  केली.