तामिळनाडूच्या २७६ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी आणि फिरकीपटू मलोलान रंगराजन यांच्या गोलंदाजीने महाराष्ट्राच्या फलंदाजांना पुरते निष्प्रभ केले. महाराष्ट्राचा पहिला डाव २३३ धावांवर संपुष्टात आणत यजमान तामिळनाडूने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ४३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
बालाजीने सुरुवातीलाच महाराष्ट्राला तीन धक्के दिल्यामुळे पाहुण्यांची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली होती. पण केदार जाधव आणि संग्राम अतितकर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रंगराजनने या दोघांचाही अडसर दूर करत महाराष्ट्राला ६ बाद १०९ अशा स्थितीत आणून ठेवले. रोहित मोटवानी (४४) आणि श्रीकांत मुंढे (६१) यांनी सातव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत प्रतिकार केला. पण मोटवानी आणि मुंढे बाद झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राचा पहिला डाव आटोपला. बालाजी आणि रंगराजन यांनी प्रत्येकी चार बळी मिळविले.