ढिसाळ आयोजनाचा फटका; मुंबई उपनगरला सर्वसाधारण विजेतेपद

स्पर्धा कशी नसावी, याचे बोलके उदाहरण ठरली ती रविवारी ठाण्यात झालेली ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धा. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेची मान्यता असलेली आणि प्रबोध डावखरे यांच्या यजमानपदाखाली झालेली ही स्पर्धा म्हणजे जणू जत्राच होती. जत्रेमध्ये जशी विविध मनोरंजनाची साधने असतात, तसेच या स्पर्धेत खेळ कमी आणि हास्यास्पद गोष्टींसह खेळाला गालबोट लावणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या. या सावळ्या गोंधळात खेळाडूंवर अन्याय करत स्पर्धा उरकण्यातच आयोजकांनी धन्यता मानली.

मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे यांच्यामुळे ही स्पर्धा लांबत गेली. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक बंद झाले. त्यानंतर प्रेक्षकांच्या गोंगाटामुळे रंगमंचावरील ‘स्टेज मार्शल’ काय सूचना करत आहे, हे शरीरसौष्ठवपटूंना कळत नव्हते. त्या दोघांमधील अंतर होते फार तर दहा फूट. गटविजेत्यांना पारितोषिक देण्यासाठी कोणत्या मान्यवरांना घेऊन जायचे, हेदेखील आयोजकांना गोंधळामुळे समजत नव्हते.

या स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी संग्राम चौगुले आणि सुहास खामकर भेटले. पण जत्रेत बाहुल्यांबरोबर छायाचित्र काढायला मिळते, तशीच स्थिती या दोन्ही नामांकितांची झाली होती. सुरक्षारक्षकांना झुगारून बऱ्याच जणांनी या दोघांबरोबर छायाचित्रे काढली. मान्यवरांबरोबर सेल्फी काढण्याची तर लाटच आली होती. रंगमंचाच्या दोन्ही बाजूला लोकांचा वेढा पडलेला होता. काही प्रेक्षक स्पर्धा सुरू असताना रंगमंचासमोर उभे होते, त्यामुळे बाकीच्यांना स्पर्धा पाहताच येत नव्हती. मग गर्दी एवढी वाढली की संघटक आणि मान्यवरांना बसायलाही खुच्र्या नव्हत्या. शरीरसौष्ठवात खरा कस मोठय़ा वजनी गटात लागतो आणि प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडते. पण दहानंतर ७५ किलो वजनी गटापासूनचे सर्व गट जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्येच उरकले गेले आणि खेळाडूंचा हिरमोड झाला.

९० किलो वजनी गटात सुनीत जाधव विजेता ठरला. पण हा निकाल ज्या पद्धतीने सांगितले गेला, ते पाहता चाहत्यांना हा ‘महाराष्ट्र-श्री’च आहे, असेच वाटले. हा निकाल जाहीर केल्यावर स्पर्धेचा विजेता कोण असेल, याची उत्सुकताच राहिली नाही आणि प्रेक्षकांनी मैदान सोडायला सुरुवात केली.

हा खेळ शरीराशी निगडित आहे. पण स्पर्धेच्या ठिकाणी एवढी धूळ होती की त्याचा त्रास शरीरसौष्ठवपटूंनाही होत होता. पण सांगणार कुणाला, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. या शरीरसौष्ठवपटूंना तयारीसाठी देण्यात आलेली जागा आणि स्वच्छतागृह वाईट दर्जाचे होते. हा खेळ ज्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना कोणतीही चांगली सुविधा या वेळी दिली गेली नव्हती. आपली कामगिरी झाल्यावर खेळाडूंना बसण्यासाठी कोणतीही राखीव जागा नव्हती. त्यामुळे सामान्य प्रेक्षकांसह धक्के खात या खेळाडूंना स्पर्धा पाहावी लागत होती. ही स्पर्धा सहा दिवसांत आयोजित केली गेली, ही गोष्ट स्तुत्य अशीच. पण ही स्पर्धा मात्र नियोजनशून्य झाली.

ओदिशाचा प्रतिहारी स्पर्धेत कसा?

ओदिशाचा सत्यजित प्रतिहारी हा मुंबई उपनगर संघाकडून खेळला. यावेळी ओदिशा संघटनेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र त्याच्याकडे नव्हते. तसेच ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत न खेळता तो थेट ‘महाराष्ट्र-श्री’ स्पध्रेत उतरला. स्पर्धेपूर्वी काही संघटकांमध्ये या विषयावरून वाद झाला. पण प्रतिहारीला खेळवण्याचा विडा उचलणाऱ्या संघटकांमुळे तो स्पर्धेत दिसला.

सुनीत जाधव अिजक्य

सध्या भन्नाट फॉर्मात सुनीत जाधवने ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. ९० किलो वजनी गटात थोडय़ा अडचणींचा सामना करत सुनीत विजेता ठरला; पण त्यानंतर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ स्पर्धेत मात्र त्याने एकहाती विजय मिळवला. या स्पर्धेत सलग चौथ्यांदा बाजी मारत सुनीतने सुहास खामकरच्या विक्रमाची बरोबरी केली आणि महाराष्ट्राची मक्तेदारी दाखवून दिली. मुंबई उपनगरला सांघिक जेतेपद देण्यात आले, तर महेंद्र चव्हाण प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू ठरला.

निकाल

पुरुष शरीरसौष्ठव- ५५ किलो : १. संदेश सकपाळ, २. नितीन शिगवण, ३. देवचंद गावडे. ६० किलो : १. नितीन म्हात्रे, २. रामा माईनाक, ३. रोशन तटकरे. ६५ किलो : १. फैयाझ शेख, २. बप्पन दास, ३. प्रवीण झोरे. ७० किलो : १. प्रतीक पांचाळ, २. श्रीनिवास वास्के, ३. विलास घडवले. ७५ किलो : १. संतोष भरवणकर, २. रोहन गुरव, ३. सोमनाथ जगदाळे. ८० किलो : १. सागर कातुर्डे, २. सुशांत रांजणकर, ३. सचिन कुमार. ८५ किलो : १. सुजन पिळणकर, २. सकिंदर सिंग, ३. संदेश नलावडे. ९० किलो : १. सुनीत जाधव, २. अरुण नेवरेकर, ३. जयवंत पारधे. ९० किलोवरील : १. महेंद्र चव्हाण, २. अतुल आंब्रे, ३.जुबेर शेख. प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू : महेंद्र चव्हाण.

  • स्पोर्ट्स फिजिक : १. निलेय बोंबले, २. मनोहर पाटील, ३. रोहन कदम.
  • महिला – शरीरसौष्ठव : १. कांची अडवाणी, २. लीला फड.
  • मॉडेल फिजिक : १. हरलिंग सेंठी, २. दीपाली ओगले, ३. जान्हवी पंडित.

सलग स्पर्धामुळे खेळाडूंचे हाल

सलग दोन दिवस स्पर्धा घेत संघटना खेळाडूंचा विचार करते का, याबाबत शरीरसौष्ठव क्षेत्रात जोरदार चर्चा होती. स्पर्धा आयोजनाच्या बैठकीत शनिवारी सकाळी ‘मुंबई-श्री’ची प्राथमिक फेरी आणि संध्याकाळी मुख्य स्पर्धा आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र-श्री’ची प्राथमिक फेरी आणि संध्याकाळी मुख्य स्पर्धा खेळवायची असे ठरवले जात होते. जर हे घडले असते तर खेळाडूंना रविवारी उभेदेखील राहता आले नसते. शनिवारी ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत भाग घेतल्यावर खेळाडूंचे शरीर थकलेले होते. एकदा स्पर्धेत उतरल्यावर शरीरसौष्ठवपटूला किमान २-३ दिवस विश्रांतीसाठी गरजेचे असतात; पण तरीही त्यांना दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेत उतरवून संघटनेने काय साधले, हे अनाकलनीयच आहे. त्यामुळे ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत जे विजेते ठरले, त्यांना ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही.