राष्ट्रीय खेळाडूंच्या बक्षिसाचे सव्वा पाच कोटी रुपये थकले; क्रीडामंत्र्यांना नऊ स्मरणपत्रे

महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या १२३ खेळाडूंचे ५ कोटी २० लाख रुपये राज्य सरकारकडे थकले आहेत. परिणामी क्रीडा धोरणाला वैतागलेल्या महाराष्ट्रातील ३० पेक्षा अधिक खेळाडूंनी आता कर्नाटक, पंजाब आणि हरियाणाच्या राज्यांमध्ये आपला समावेश व्हावा, असे प्रयत्न सुरू केले आहेत. काही खेळाडूंनी तर अन्य राज्यातील संघाकडून खेळायला सुरुवातही केली असल्याचे वृत्त आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुवर्णपदक विजेत्याला पाच लाख, रौप्य पदकाला तीन, कांस्यपदक विजेत्याला दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील रक्कम क्रीडापटूंना अजूनही मिळालेली नाही.

केरळ येथे २०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्राच्या खो-खो संघात  शिवछत्रपती पुरस्कार विजेती सुप्रिया गाढवे आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेती सारिका काळे या दोघींचा समावेश होता.  यांच्यासह राज्यातील १२ खेळाडूंचा यात समावेश होता. सुवर्णपदक जिंकलेल्या या संघाचा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत जंगी सत्कार केला. मात्र या बक्षिसाचे ६० लाख रुपये दोन वष्रे झाले तरी देखील त्यांना मिळालेले नाही.

ऑलिम्पिक संघटनेने क्रीडामंत्री तावडे यांना रखडलेल्या बक्षिसाच्या रकमेविषयी नऊ स्मरणपत्रे दिली आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांपर्यंतदेखील ऑलिम्पिक संघटनेने पाठपुरावा केला. मात्र क्रीडा खात्याच्या कारभारात तिळमात्र देखील फरक पडलेला नाही.

क्रीडामंत्री तावडे निष्क्रिय – धनंजय भोसले

सध्याच्या घडीला दर्जेदार खेळाडू महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये खेळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन वर्षांपासून त्यांच्या पारितोषिकाची रक्कम राज्य सरकार देऊ शकले नाही. मदानात केवळ हजेरी लावणाऱ्यांना गुणदान करणाऱ्या क्रीडा संघटनांची कोटय़वधींमध्ये उलाढाल आहे. गुणांच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी करूनही कारभारात फरक नाही. राज्याचे क्रीडा धोरण सक्षमपणे राबविण्यात कुचकामी ठरलेले विनोद तावडे हे सर्वात निष्क्रिय क्रीडामंत्री असल्याची टीका महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे खजिनदार धनंजय भोसले यांनी केली आहे.

केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेमध्ये महाराष्ट्राने चौथा क्रमांक मिळविला. यात २३ खेळाडूंना सुवर्ण, ४३ खेळाडूंना रौप्य तर ५० जणांनी कांस्यपदक मिळविले.  त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकाला देखील दोन लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार होता. क्रीडामंत्री तावडे यांनी मुंबईत सत्कार समारंभात बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचे घोषित केले. मात्र अद्याप काहीही रक्कम मिळू शकलेली नाही.

सारिका काळे, भारतीय खो-खो संघाची कर्णधार