अंकित बावणे (५१) व चिराग खुराणा (४८) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीमुळेच महाराष्ट्रास ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात शनिवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावात ७ बाद २६४ धावांपर्यंत मजल गाठता आली. चार दिवसांच्या या सामन्यास शनिवारी संबळपूर येथे सुरुवात झाली.
विराग आवटे व हर्षद खडीवाले यांनी सलामीसाठी ६३ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्रास आश्वासक सुरुवात करून दिली होती मात्र महाराष्ट्राने त्यानंतर ३५ धावांमध्ये चार गडी गमावले. खडीवाले हा ४३ धावा करून तंबूत परतला. त्यामध्ये त्याने सहा चौकार मारले. विदर्भविरुद्धच्या लढतीत पदार्पणातच लागोपाठ दोन शतके करणारा आवटे हा २५ धावांवर बाद झाला. संग्राम अतितकर (०) व कर्णधार रोहित मोटवानी (१०) यांनी निराशा केल्यामुळे महाराष्ट्राची ४ बाद ९८ अशी स्थिती झाली.
महाराष्ट्राची ही घसरगुंडी बावणे याने रोखली. त्याने केदार जाधव याच्या साथीत ४१ धावा तर खुराणाच्या साथीत ७८ धावांची भर घातली. जाधवने सहा चौकारांसह ३३ धावा केल्या. बावणेने एक षटकार व नऊ चौकारांसह ५१ धावा केल्या. खुराणाने दमदार फलंदाजी करीत ४८ धावा केल्या. त्याने श्रीकांत मुंढेच्या साथीत ३३ धावांची भर घातली. अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी खुराणा याला बसंत मोहंती याने बाद केले. खेळ संपला त्या वेळी मुंढे व अक्षय दरेकर हे अनुक्रमे १९ व ४ धावांवर खेळत होते. ओडिशाकडून मोहंतीने सर्वाधिक दोन बळी घेतले तर निंरजन बेहरा, लगनजित समाल, दीपक बेहरा, अलोकचंद्र साहू व बी.बसंतराय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.